'व्हॅनचे पंक्चर काढून येतो', सांगून चालक एटीएमची ८५ लाखांची रोकड घेऊन पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:41 PM2024-03-26T12:41:15+5:302024-03-26T12:42:07+5:30
तुळजापूरची घटना : एटीएममध्ये भरण्यासाठी नेली होती रक्कम
तुळजापूर (जि. धाराशिव) : कॅश व्हॅनचे पंक्चर काढून येतो, असे सांगून एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी आणलेले ८५ लाख रुपये घेऊन व्हॅन चालक पसार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तुळजापुरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चालकाचा शोध घेताना पोलिसांना शहरातच व्हॅन सापडली, मात्र त्यात कॅश नव्हती.
हिताची कॅश मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस यांचे दोन कॅश कस्टोडीअन, सुरक्षा रक्षक आणि चालक हे धाराशिव येथून कॅश व्हॅनद्वारे १ कोटी २२ लाख रुपये एटीएममध्ये भरण्यासाठी शुक्रवारी सकाळी तुळजापूरकडे निघाले होते. तत्पूर्वी त्यांनी धाराशिव येथील एटीएममध्ये ३७ लाख रुपये भरले व उर्वरित ८५ लाख रुपये घेऊन तुळजापूरकडे रवाना झाले. दरम्यान, तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवर असलेल्या खासगी बँकेच्या समोर कॅश व्हॅन थांबवून दोन कॅश कस्टोडीअन व सुरक्षा रक्षक बँकेत गेले. यावेळी चालकाने बँकेत गेलेल्या कर्मचाऱ्यांना फोनवरून वाहन पंक्चर झाल्याचे सांगत ते काढून येतो, असे सांगितले. बराच वेळ झाला तरी तो येत नसल्याने फोन केला असता तोही बंद आढळून आला. यामुळे कर्मचाऱ्यांनी लागलीच तुळजापूर ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच दखल घेत शोध सुरू केला असता धाराशिव रस्त्यावर शहरातच व्हॅन आढळून आली. आत पाहिले असता त्यात एक छदामही आढळून आला नाही. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी वैभव शेरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक सचिन विलास पारसे (रा. धाराशिव) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी साडेचार वर्षांपासून कामावर...
हिताची कॅश मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये आरोपी चालक सचिन विलास पारसे हा मागील साडेचार वर्षांपासून कॅश व्हॅन चालक म्हणून कार्यरत होता. या काळात त्याने कंपनीचा विश्वास संपादन केला होता. यानंतर आता थेट त्याने ८५ लाखांवरच डल्ला मारला.
तपासासाठी आठ पथके...
कॅश व्हॅन चालकाने कर्मचारी बँकेत गेल्यानंतर वाहन पंक्चर झाल्याचे खोटे सांगून ते काढण्याचा बहाणा केल्याचे दिसून येत आहे. या घटनेत एकूण ८५ लाख रुपयांची चोरी झाली असून, आरोपी चालक रक्कम घेऊन पसार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास आठ पथके तयार करून तपास सुरू केल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी सांगितले.