शालेय विद्यार्थी पालकांना शेती कामात करताहेत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:21+5:302020-12-27T04:23:21+5:30

जेवळी : कोरोनाच्या धास्ती आणि लाॅकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसल्याने प्राथमिक आणि ...

School children help parents in farming | शालेय विद्यार्थी पालकांना शेती कामात करताहेत मदत

शालेय विद्यार्थी पालकांना शेती कामात करताहेत मदत

googlenewsNext

जेवळी : कोरोनाच्या धास्ती आणि लाॅकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नसल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी आपल्या पालकांना शेतीच्या कामात मदत करीत आहेत.

काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर शासनाने शाळा बंद केल्या. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग मागील काही दिवसांपूर्वी सुरू केले असले तरी उर्वरित वर्ग अद्याप बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याबाबत शासनाने आदेश काढले. परंतु, अनेक शाळांमध्ये आदेश फारसे गांभीर्याने घेतले गेले नाहीत. तर काही शाळांकडून प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनाही विस्कळीत इंटरनेट सुविधेचा फटका बसत आहे. जिल्हा परिषद शाळांची अवस्था तर फारच केविलवाणी आहे. मुलांचे व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून दररोज पीडीएफच्या माध्यमातून अभ्यासक्रम पाठविला जातो. परंतु, त्या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा फारसा हाेत नाही. त्यामुळे हे शिक्षण किती विद्यार्थ्यांना उपयोगी पडले? हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तके मोफत वाटप करण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्ष शिकविलेच नसल्याने मिळालेली स्वाध्याय पुस्तके सोडवायची कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. परिणामी अनेक विद्यार्थी आपल्या पालकांना विशेषकरून शेती कामात मदत करताना दिसून येत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आई-वडिलांपेक्षा शाळेतील गुरूजींची भीती अधिक असते. त्या भीतीपोटी मुले अभ्यास करतात. मात्र सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे त्यांना अनावश्यक सवयी लागू नयेत, यासाठी आम्ही मुलांना शेतात घेऊन जाताे.

-राजू फुलचंद बिराजदार, पालक, दक्षिण जेवळी.

पुस्तके वाचून स्वाध्याय पुस्तके सोडवतील इतकी प्रगती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नाही.शाळा सुरू असताना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुलं शिक्षकांसोबत असतात. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना मुलांची चिंता नव्हती. शाळेतील अभ्यास, होमवर्क, आणि वेळ मिळाल्यानंतर खेळ यातच मुले व्यस्त होती. आता शाळा बंद असल्याने मुलं उनाडक्या करीत फिरणार म्हणून त्यांना दररोज शेतातील कामात मदतीसाठी घेऊन जात आहे.

-दत्तात्रय होनाजे, पालक, जेवळी.

Web Title: School children help parents in farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.