शाळेतील शौचालयाची भिंत कोसळून विद्यार्थिनी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:17 PM2018-12-07T13:17:31+5:302018-12-07T13:20:42+5:30
गंभीर दुखापत झालेल्या या विद्यार्थिनीवर सद्या बार्शी (जि. सोलापूर) येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कळंब (उस्मानाबाद) - शाळेतील शौचालयाच्या आडोशासाठी उभारण्यात आलेली भिंत कोसळून, त्यातील विट डोक्यात लागल्याने बुधवारी दहिफळ जि.प.प्राथमीक शाळेतील एक विद्यार्थिनी जखमी झाली आहे. गंभीर दुखापत झालेल्या या विद्यार्थिनीवर सद्या बार्शी (जि. सोलापूर) येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.शाळेला काही वर्ग खोल्या नवीन मिळाल्या असल्या तरी त्यालगतच शाळेची जूनी इमारत आहे.नवीन व जूनी अशा दोन्ही इमारती आसपासच आहेत. बुधवारी शाळेत गोवर-रूबेला लसीकरणाचा कार्यक्रम होता.शाळेत याचीच लगबग होती. यादरम्यान शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी स्मिता संदिप घेवारे ही विद्यार्थिनी जुन्या इमारती लगतच्या स्वच्छतागृहाकडे गेली. यावेळी या स्वच्छतागृहास आडोसा म्हणून उभारण्यात आलेली भिंत अचानक कोसळली.
भिंत कोसळत असतांना लगतच असलेल्या स्मिताच्या डोक्यास एक विट लागली. यात गंभीर इजा झाल्याने शाळेतील शिक्षकांनी स्मिताला प्रथम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व यानंतर तेथून उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात तात्काळ उपचारार्थ दाखल केले. दुखापत गंभीर असल्याने स्मिताला तातडीने बार्शी येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, शाळा परिसरातील संपुर्ण जून्या इमारतीचे निर्लेखन करणेचे गरजेचे बनले असतांना आजवर याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.