‘सुंदर माझं कार्यालय’अंतर्गत शाळेचे रूपडे पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:31 AM2021-03-16T04:31:52+5:302021-03-16T04:31:52+5:30
(फोटो : बालाजी बिराजदार १५) लोहारा : तालुक्यातील बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘सुंदर माझं कार्यालय’अंतर्गत शाळेची रंगरंगोटी, वृक्षारोपणासह विविध ...
(फोटो : बालाजी बिराजदार १५)
लोहारा : तालुक्यातील बेलवाडी जिल्हा परिषद शाळेत ‘सुंदर माझं कार्यालय’अंतर्गत शाळेची रंगरंगोटी, वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून ही शाळा ‘मॉडेल स्कूल’ बनत आहे.
विभागीय आयुक्त केंद्रेकर याच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सर्व तालुकास्तरीय कार्यालयात हा उपक्रम राबविला जात आहे. यानुसार गटविकास अधिकारी सोपान अकेले व सहायक गटविकास अधिकारी संजय ढाकणे यांनी सर्व विभागप्रमुख यांची दोनवेळेस बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यानुसार बेलवाडी जि. प. प्राथमिक शाळेत रंगरंगोटी, कार्यालयीन ठेवण, उपस्थिती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यासह इतरही नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी पुढाकार घेतला आहे.
प्रयोगशाळा ग्रंथालय महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत बाल दिनानिमित्त उपक्रम राबवला होता. त्यामध्ये बेलवाडी शाळेने प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच स्वाध्याय पुस्तिका उपक्रम सोडविण्यात आला आहे. ‘गोष्टीचा शनिवार’ असे अनेक उपक्रम राबवले जातात. यासाठी मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, अनंत कानेगावकर, शिक्षक मल्लिकार्जुन कलशेट्टी, सुनंदा निर्मले, मोरवे खिजर आदी प्रयत्नशील आहेत.
कोट......
शाळा इमारतीस रंगरंगोटी केल्यामुळे चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. शाळेतील सर्व शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून ही एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जात आहे.
- लव्हू जाधव, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती
‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ व स्वाध्याय पुस्तिका दीक्षा ॲपवरील प्रशिक्षण तसेच ऑनलाईन प्रशिक्षण असे महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ते खूप चांगल्या पध्दतीने शाळेमध्ये आम्ही राबवले आहेत.
मल्लिकार्जुन कलशेट्टी, सहशिक्षक
बालकांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी लहान विद्यार्थ्यांना व्हाईट बोर्ड ॲण्ड स्टडी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
- परमेश्वर सूर्यवंशी, मुख्याध्यापक
बेलवाडीची जिल्हा परिषद शाळा ही विनाघंटीची असून, मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेला लोकसहभागातून शैक्षणिक साहित्य मिळवण्यात यश मिळवले आहे. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक मेहनत घेत असून, नक्कीच ही शाळा एक मॉडेल स्कूल म्हणून उभारी घेत आहे.
- मोहन शेवाळे, प्रभारी केंद्रप्रमुख, लोहारा