११ केंद्रांवरून आज कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:33 AM2021-05-12T04:33:25+5:302021-05-12T04:33:25+5:30
उस्मानाबाद : पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या ४५ वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी दुसरा डोस राज्य शासनाने उपलब्ध करून दिला ...
उस्मानाबाद : पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या ४५ वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी दुसरा डोस राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. बुधवारपासून जिल्ह्यातील ११ केंद्रांवर कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. याशिवाय पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांसाठीही सुमारे ६७ केंद्रांवर लस उपलब्ध झाली आहे.
राज्य शासनाने खरेदी केलेली कोव्हॅक्सिन लस पडून असतानाही त्याचा वापर दुसऱ्या डोससाठी केला जात नव्हता. या लसी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांसाठीच वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना लसीकरण विभागास देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ४५ वर्षे व त्यावरील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सना केंद्र शासनाने पुरविलेल्या साठ्यातून कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यामुळे या नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही केंद्र शासनाने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू होते. असे असताना अनेक नागरिकांच्या दुसऱ्या डोसची तारीखही उलटून गेली, तर काहींची नजीक आली होती. मात्र, लसीकरण विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोव्हॅक्सिन या पहिल्या डोससाठीच वापरण्याच्या सूचना असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेतील लाभार्थीं चिंतित होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून या समस्येला वाचा फोडली. यानंतर लागलीच १० मे रोजी राज्याच्या आरोग्य विभागाने पत्र काढून सर्व जिल्ह्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्याकोव्हॅक्सिन या केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरण्याच्या सूचना दिल्या. याअनुषंगाने जिल्हा लसीकरण विभागाने लागलीच याबाबतचे नियोजन पूर्ण केले. आता बुधवारपासून जिल्ह्यातील ११ केंद्रांवरून कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देय असलेल्या नागरिकांना मिळणार आहे. ही लस तूर्त दुसऱ्या डोससाठीच वापरण्यात येणार असल्याने पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना कोविशिल्डची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लस १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना जिल्ह्यातील ६७ केंदांवरून मिळणार आहे.
.......येथे होणार लसीकरण......
कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस...
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, परंडा, कळंब, तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालये, लोहारा भूम, वाशी, तेर, सास्तूर, मुरुम येथील ग्रामीण रुग्णालये व उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयांतर्गत चिंचोळी हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येईल.
४५ वर्षांवरील नागरिक...
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर व ४५ वयावरील नागरिकांना शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, नागरी आरोग्य केंद्र खिरणीमळा उस्मानाबाद, नागरी आरोग्य केंद्र शाहूनगर उस्मानाबाद, पोलीस रुग्णालय उस्मानाबादसोबतच सर्व ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे व निवडक १९ उपकेंद्रांवरून कोविशिल्डचा डोस देण्यात येईल. यातही दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थींना सकाळी ९ ते दुपारी या वेळेत प्राधान्य मिळेल. दुपारी १२ वाजेनंतर पहिला व दुसरा डोस क्रमानुसार देण्यात येईल.
१८ ते ४४ वयोगट थांबविला...
लसी वेळेत व पुरेशा उपलब्ध होत नसल्याने लसीकरणावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ४५ वर्षे व त्यावरील वयोगटाला सध्या प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. परिणामी, १८ ते ४४ वयोगटासाठी १ मेपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला तूर्त ब्रेक बसला आहे. पुढील काही दिवस या वयोगटाला लस मिळण्याची शक्यता कमी आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तसे बुधवारी सूचित केले आहे.