पावणेसहाशेवर थकबाकीदार गाळेधारकांना नगरपरिषदेकडून दुसऱ्यांदा नाेटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 03:11 PM2021-03-15T15:11:20+5:302021-03-15T15:12:48+5:30
उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक, तुळजापूर नाका, देशपांडे स्टँड, नेहरू चाैक आदी भागांत जवळपास पाच काॅम्प्लेक्स उभे केले आहेत.
उस्मानाबाद : व्यापाऱ्यांची गैरसाेय दूर व्हावी, यासाठी नगरपरिषदेकडून शहराच्या विविध भागांत व्यापारी संकुले उभारली. यातील पावणेसहाशेवर गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत, परंतु अनेकांकडून नियमित भाडे पालिकेला भरले जात नाही. त्यामुळे थकबाकीचा डाेंगर वाढत जाऊन सुमारे पाच काेटी झाला आहे. थकीत रक्कम भरणा करावी, यासाठी पालिकेकडून गाळेधारकांना नाेटीस देण्यात आली, परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, आता दुसरी नाेटीस देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास गाळे ‘सील’ करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक, तुळजापूर नाका, देशपांडे स्टँड, नेहरू चाैक आदी भागांत जवळपास पाच काॅम्प्लेक्स उभे केले आहेत. यातील तब्बल ५८५ गाळे व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात बहुतांश गाळेधारक नियमित भाडे भरत हाेते, परंतु कालांतराने आजघडीला थकीत भाडे व त्यावरील व्याज मिळून सुमारे पाच काेटी रुपये थकबाकी झाली आहे. मार्चअखेरच्या अनुषंगाने पालिकेकडून कर वसुली माेहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गतच सुमारे पावणेसहाशेवर व्यापाऱ्यांना पालिकेने नाेटिसा देऊन थकबाकी भरण्याबाबत सूचना केली हाेती, परंतु या नाेटिशीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा दुसरी नाेटीस बजावली आहे. थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्याकडील रक्कम ३१ मार्चपूर्वी भरणा करावी, असे त्यात म्हटले आहे. यानंतरही ज्या गाळेधारकांनी थकबाकी भरलेली नसेल, त्यांचे गाळे थेट सील करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
पालिकेकडून नाेटिसा बजावण्यात आल्यानंतर, अनेकांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने, दुबार नाेटिसा देण्यात आल्या आहेत. यानंतरही म्हणजेच ३१ मार्चअखेर जे गाळेधारक थकबाकीत असतील, त्यांचे गाळे सील करण्यात येणार आहेत. थकबाकी भरणे गाळेधारकांच्या आवाक्यात यावे, यासाठी सवलतही देण्यात आली आहे.
- हरिकल्याण येलगट्टे, सीओ, नगरपरिषद, उस्मानाबाद