रेमडेसिविरसाठी नातेवाईक भटकले तर पहाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:33 AM2021-04-24T04:33:31+5:302021-04-24T04:33:31+5:30
उस्मानाबाद : रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन देण्याविषयी वैद्यकशास्त्रीय प्रमाणिकरणाची व नंतर ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही त्या-त्या रुग्णालयांचीच आहे. ...
उस्मानाबाद : रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन देण्याविषयी वैद्यकशास्त्रीय प्रमाणिकरणाची व नंतर ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही त्या-त्या रुग्णालयांचीच आहे. विनाकारण नातेवाइकांना इंजेक्शनसाठी भटकंती करायला भाग पाडल्यास कायदेशीर कारवाई करू, अशी तंबीच जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयांना शुक्रवारी एका आदेशाद्वारे दिली आहे.
उस्मानाबादेत रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी मारामार सुरू आहे. प्रचंड तुटवड्यामुळे खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांचाही ताण प्रशासनावर वाढला आहे. दरम्यान, प्रशासनाने उपलब्ध झालेले इंजेक्शन हे आपल्या माध्यमातून गरजेनुसार वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी रुग्णालयांना तंबी देणारे आदेशच जारी केले आहेत. रुग्ण ज्या रुग्णालयात उपचार घेत आहे, त्या रुग्णालयानीच स्वत: रुग्णास रेमडेसिविर व अन्य औषधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असताना अनेक रुग्णालये नातेवाइकांना बाहेरुन इंजेक्शन आणण्याची सक्ती करीत आहेत. हेल्पलाईनवरही इंजेक्शनबाबतच सर्वाधिक तक्रारी होत आहेत. शिवाय, चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नातेवाइकांची वर्दळ वाढली आहे. ही बाब उचित नाही. एखाद्या रुग्णास इंजेक्शनची आवश्यकता असल्यास त्याची वैद्यकशास्त्रीय प्रमाणिकरणाची जबाबदारी संबंधित रुग्णालयाचीच आहे. शिवाय, त्याच्या उपलब्धततेची जबाबदारीही रुग्णालयाचीच आहे. इंजेक्शन व औषधी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरुन आणण्यास सांगू नये. यामुळे त्यांची बाहेर भटकंती होत असून, त्याद्वारे संसर्गाचा धोका वाढत आहे, असे सूचित करतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन रुग्णालयांनी नाही केल्यास कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.