उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सात अभियंते अडकले चौकशीच्या फेऱ्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 05:02 PM2019-01-22T17:02:35+5:302019-01-22T17:16:57+5:30
अभियंत्यांविरूद्ध विभागीय चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी प्रस्तावित केली आहे.
उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगाव या रस्ते कामातील अनियमितता अखेर अधिकाऱ्यांच्या अंगाशी आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख असलेल्या कमिटीने सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे पाच उपअभियंत्यांसह दोन शाखा अभियंत्यांविरूद्ध विभागीय चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी प्रस्तावित केली आहे.
लोहारा तालुक्यातील धानुरी ते करजगाव या रत्यावर (ग्रामीण मार्ग क्र.३१) जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुधार योजनेच्या माध्यमातून २०१२-१३ ते २०१७-१८ या कालावधीत लाखो रूपयांची कामे मंजूर करून ती करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी सदरील रस्त्यावर कामे झालीच नाहीत, अशी तक्रार धानुरीच्या ग्रामस्थांनी स्थानिक अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरून यंत्रणेकडून फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. दरम्यानच्या काळात यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या नेतृत्वाखाली समितीही नेमण्यात आली होती. या समितीत काही तांत्रिक अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या समितीने स्पॉटवर जाऊन कामांची पाहणी करून चौकशी अहवाल तयार केला. हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना सादर केल्यानंतर २१ जानेवारी रोजी दोषी आढळून आलेल्या पाच उपअभियंत्यांसह दोन शाखा अभियंत्यांविरूद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय चौकशी अंती कोणत्या अभियंत्याविरूद्ध काय कारवाई होते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.