समुपदेशानांती दुभंगलेले सातशे संसार पुन्हा फुलले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:35 PM2018-09-19T15:35:31+5:302018-09-19T15:36:35+5:30
महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे आल्यानंतर समुपदेशानांती ७०० जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले आहेत.
उमरगा (उस्मानाबाद ) : अनिष्ट प्रथा, चालीरित, अंधश्रद्धा, हुंड्यासाठी विवाहितेला होणारा जाच-जुलूम, चारित्र्यावर संशय आदी विविध कारणांमुळे मागील तीन वर्षांत तालुक्यातील जवळपास ८०० जोडप्यांचे संसार दुभंगले होते. ही प्रकरणे येथील महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे आल्यानंतर समुपदेशानांती ७०० जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले आहेत.
हुंडा देण्या-घेण्यासह विविध कारणांमुळे पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींमध्ये घट व्हावी, न्यायालय, व पोलीस यंत्रणेच्या वेळेची बचत व्हावी, तक्रारदार महिलेची आर्थिक बचत व्हावी या हेतुने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार येथील ठाण्यात महिला सुरक्षा विशेष कक्षाची स्थापना २९ मार्च १९९८ रोजी करण्यात आली. समितीसमोर येणाऱ्या प्रकरणांमध्ये संबंधित जोडप्यांचे समुपदेशन करण्यासाठी पत्रकार, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्यांची कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
या कक्षाच्या माध्यमातून पती-पत्नीसह कुटुंबातील सासू-सासरे, नणंद, जाऊ, दिर अथवा अन्य नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. तीन वर्षांच्या कालावधीत उमरगा येथील कक्षाकडे थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ८०० प्रकरणे दाखल झाली होती. समुपदेशनाच्या माध्यमातून जवळपास ७०० जोडप्यांचे मन आणि मत परिवर्तन करण्यात कक्षाला यश आले आहे. ही सर्व जोडपी सध्या गुण्यागोविंदाने रहात असल्याचे कक्षाकडून सांगण्यात आले.