परंडा येथे दहा व्यापाऱ्यांकडून ७० किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:49 PM2018-10-09T18:49:19+5:302018-10-09T18:49:50+5:30
नगर परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरातील १० व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करीत ७० किलो प्लास्टिक जप्त केले.
परंडा ( उस्मानाबाद) : नगर परिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरातील १० व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करीत ७० किलो प्लास्टिक जप्त केले. यापैकी दोन व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आकारला.
पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेऊन शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिकच्या कॅरिबॅग वापरावर बंदी घातली आहे. सुरुवातीला कारवाई केल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा १० हजार तर तिसऱ्यांदा कारवाई झाल्यास २५ हजार रुपये दंडासह शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. असे असतानाही परंडा शहरातील अनेक व्यापारी खुलेआम प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर करीत असल्याचे दिसून आल्यानंतर आज नगर परिषद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वतीने शहरातील दहा व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली.
या व्यापाऱ्यांकडून जवळपास ७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. दहा पैकी दोघांना प्रत्येकी ५ हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. मोहिमेत मुख्याधिकारी दीपक इंगोले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, एन.पी. दारसेवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
मोहीम आणखी कडक करणार
राज्य शासनाने प्लास्टिक कॅरिबॅगच्या वापरावर बंदी घातली आहे. असे असतानाही शहरातील काही व्यापारी अशा कॅरिबॅगचा वापर करीत आहेत. त्यामुळेच पालिकेच्या वतीने मंगळवारी शोधमोहीम राबविण्यात आली. जवळपास ७० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. ही मोहीम आणखी कडक करण्यात येणार आहे.
- जाकीर सौदागर, नगराध्यक्ष, परंडा.