खुदावाडी ते अणदूर रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:06+5:302021-09-07T04:39:06+5:30
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर ते खुदावाडी या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांसाेबतच ग्रामस्थ, ...
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर ते खुदावाडी या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना वाहनधारकांसाेबतच ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहेत.
खुदावाडी ते अणदूर हे चार किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गावरून खुदावाडीकरांना शाळा, दवाखाने, बॅंकेसह बाजारपेठेत जावे लागते. मात्र, मागील काही महिन्यांत या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. जागाेजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या त्रासाचा तर विचार न केलेलाच बरा. एक खड्डा चुकवेपर्यंत वाहनाचे चाक दुसऱ्या खड्ड्यात आदळते. यातून वाहनांचा चक्क खुळखुळा हाेत आहे. वाधनधारकांचे मणके खिळखिळे झाले आहेत. दरम्यान, हा रस्ता दुरूस्त करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु, आजवर आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे रिमझिम स्वरूपाचा पाऊस आला तरी या खड्ड्यांना डबक्याचे स्वरूप येते. ग्रामस्थांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने जवळपास चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, आजवर त्यावर कुठलाच निर्णय झालेला नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काेट...
रस्त्याची किमान डागडुजी तरी करण्यात यावी, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. परंतु, संबंधित प्रस्तावावर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही. या प्रश्नी वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
-शरद नरवडे, सरपंच, खुदावाडी.
खुदावाडी ते अणदूर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्ता असता तर आमदार राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्याची डागडुजी केली असती.
-रेणुका इंगोले, सभापती, पंचायत समिती, तुळजापूर.
खुदावाडी ते अणदूर या रस्त्याची खराेखर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसाेय हाेत आहे. या प्रश्नी जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत आवाज उठविला जाईल.
- महेंद्र धुरगुडे, सदस्य, जिल्हा परिषद.
खुदावाडी ते अणदूर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ग्रामस्थांची हाेणारी गैरसाेय लक्षात घेऊन संबंधित विभागाने किमान खड्डे बुजविण्याचे काम तरी हाती घ्यावे.
-महादेव सालगे, ग्रामस्थ, खुदवाडी.