चिखलमय डबक्यात लावले बेशरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:25+5:302021-06-30T04:21:25+5:30

कळंब : मुजोर ठेकेदार, हात बांधून बसलेले रस्ते विकास महामंडळाचे अभियंता यांच्या बेफिकिरीत रस्त्याचे काम थांबल्याने लोकांना त्रास होत ...

Shameless in a muddy puddle | चिखलमय डबक्यात लावले बेशरम

चिखलमय डबक्यात लावले बेशरम

googlenewsNext

कळंब : मुजोर ठेकेदार, हात बांधून बसलेले रस्ते विकास महामंडळाचे अभियंता यांच्या बेफिकिरीत रस्त्याचे काम थांबल्याने लोकांना त्रास होत असताना संबंधितांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने मंगळवारी मुख्य चौकात साचलेल्या चिखलमय डबक्यात बेशरमाची लागवड करून गांधीगिरी केली.

खामगाव-पंढरपूर या नव्या राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या केज-कळंब-कुसळंब या साठ किलोमीटर लांबीच्या रस्ता कामास दोन वर्षांची मुदत होती. सदर काम मुदतीत पूर्ण होणे तर दूरच उलट दोनाची चार वर्षे उलटूनही काम अर्धवटच आहे. या कामाचा ठेका घेतलेली कंपनी व रस्ते विकास महामंडळाचे अभियंता यांच्या ‘मिले सुर तेरा मेरा’ पवित्र्यामुळेच काम रेंगाळले आहे. याकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे, ना एखाद्या चळवळ्याचे. या स्थितीत कळंब शहरातील ४ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाने तर कहर केला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते होळकर चौक या भागात एक बाजू पूर्ण करून दुसरी बाजू अर्धवट ठेवली आहे. यामुळे पडलेल्या पावसाचे पाणी तेथे साचत आहे. यातून चिखलमय डबकी आकाराला आली आहेत. यांची खोली वाढल्याने त्यांतून वाहने चालविताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. मागच्या दोन दिवसांत तर अनेकांना याचा फटका सहन करावा लागला. अनेक वाहने घसरली. अनेकांना स्वतःचा तोल सांभाळताना मोठी कसरत करावी लागली. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वारंवार मागणी करूनही बेफिकीर रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व आपल्याच ठेक्यात असलेली कंपनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते होळकर चौकातील कामाला गती देत नसल्याने, तात्पुरता मुरुमही टाकत नसल्याने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इम्रान मिर्झा, संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड, अभयसिंह आडसूळ, स्वप्निल बरकसे, रणजीत पवार, गोरख सौदागर, सागर देवकर आदींनी चौकातील साचलेल्या डबक्यांत ‘बेशरम’ झाडाच्या फांद्या लावत अनोखे गांधीगिरी आंदोलन केले.

चौकट......

आमदार, तहसीलदारांच्या सूचनाही झाल्या बेदखल

दरम्यान, या विषयावर आ. कैलास पाटील यांनी संबंधित रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी तत्काळ तात्पुरता मुरूम टाकून घ्यावा, असे सूचित केले आहे. शिवाय, तहसीलदार रोहन शिंदे यांनी येरमाळा येथे अशीच स्थिती अूसन, आजच तेथे काम करावयास सांगितले आहे. कळंब येथील कामाच्या संदर्भात कळविले आहे, असे सांगितले. मात्र, आमदार, तहसीलदारांनी सूचना देऊनही मंगळवारी विशेष असा फरक दिसून आला नव्हता.

Web Title: Shameless in a muddy puddle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.