आघाडीत पेच! परंड्यापाठोपाठ तुळजापुरातही शरद पवारांचा उमेदवार; उद्धवसेना, कॉँग्रेस चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:20 AM2024-11-01T11:20:47+5:302024-11-01T11:23:49+5:30
कोण माघार घेणार की दोन्ही पक्ष लढणार, हे सोमवारी स्पष्ट होईल.
धाराशिव : महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने परंडा व तुळजापूर मतदारसंघावर यापूर्वीच दावा ठोकला होता. मात्र, या दोन्ही जागा तिन्ही पक्षांच्या पेचात अडकल्या. परंड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराविरुद्ध उद्धवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. पाठोपाठ तुळजापुरातही शरद पवार गटाने काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार रिंगणात उतरविला आहे. यांपैकी कोण माघार घेणार की दोन्ही पक्ष लढणार, हे सोमवारी स्पष्ट होईल.
धाराशिव जिल्ह्यातील चारपैकी परंडा व तुळजापूर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दावा केला होता. त्यानुसार त्यांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्राही या दोन मतदारसंघातच घेण्यात आली. यानंतर वाटाघाटीत दोन्ही जागेवरून पेच निर्माण झाला. परंड्यासाठी उद्धवसेना आग्रही राहिली तर तुळजापूर पारंपरिकरीत्या काँग्रेस लढत आल्याने येथे काँग्रेसचा दावा मजबूत राहिला.
परिणामी, राष्ट्रवादीच्या या दोन्ही जागांवर तडजोड घडून आली नाही. परंड्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणजित पाटील यांचे नाव जाहीर केले, दुसऱ्या दिवशीच शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी आपला एबी फॉर्मसह अर्ज भरला. येथून माघार कोणी घ्यायची, हे अजूनही ठरले नाही. असे असतानाच अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तुळजापूर मतदारसंघातून जीवनराव गोरे यांनी शरद पवार गटाकडून अर्ज दाखल केला. छाननीत त्यांचा अर्ज वैधही ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावरून आघाडीत अजूनही पेच आहे. तो सुटण्यासाठी सोमवारची वाट पाहावी लागणार आहे.