video:'शिंदे समिति गो बॅक'; धाराशिवमध्ये आरक्षण समितीची गाडी अडविली,काळे झेंडे दाखवले
By बाबुराव चव्हाण | Published: October 27, 2023 04:46 PM2023-10-27T16:46:03+5:302023-10-27T16:48:03+5:30
शिंदे समिती वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.
धाराशिव : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या प्रक्रियेत सुसूत्रता आण्याच्या हेतुने निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती गठित केली आहे. ही समिती शुक्रवारी धाराशिवमध्ये आली हाेती. कामकाज आटाेपून सायंकाळी साडेचार वाजता समिती परत जात असताना मराठा तरूणांनी ‘शिंदे समिती गाे बॅक’च्या घाेषणा देत काळे झेंडे दाखविले. संतप्त झालेल्या काहीजणांनी तर समितीच्या गाड्या राेखण्याचाही प्रयत्न केला.
मराठा आरक्षणावरील शिंदे समितीला धारशिवमध्ये संतप्त जमावाने दाखविले काळे झेंडे. गाडीही रोखली pic.twitter.com/YZeGmq7b7N
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 27, 2023
निवृत्त न्या. शिंदे समिती शुक्रवारी धाराशिव दाैऱ्यावर हाेती. सकाळी साडेअकरा वाजता बैठक सुरू झाली असता, पहिल्या टप्प्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. दुपारी २ नंतर नागरिकांकडून पुरावे स्वीकारण्यात आले. कामकाज आटाेपून ही समिती सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जिल्हा कचेरीतून बाहेर पडत असताना मराठा तरूणांनी ‘शिंदे समिती गाे बॅक’अशा घाेषणा देत काळे झेंडे दाखविले. संतप्त झालेल्या काहींनी तर पाेलिसांचे कडे भेदून समिती पदाधिकाऱ्यांच्या वाहनापर्यंत धाव घेतली. काचावर थाप मारून संबंधित वाहन राेखले. पाेलिसांनी धाव घेत तरूणांना बाजुला केल्यानंतर वाहन मार्गस्थ झाले. राज्य सरकार निवृत्त न्या. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढूपणा करीत आहे, असा आराेप यावेळी आंदाेलक तरूणांनी केला.