शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:24+5:302021-09-04T04:39:24+5:30
शिराढोण - कळंब तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेले आरोग्य केंद्र म्हणून शिराढाेणची ओळख आहे. परंतु, मागील आठवडाभरापासून या ...
शिराढोण - कळंब तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेले आरोग्य केंद्र म्हणून शिराढाेणची ओळख आहे. परंतु, मागील आठवडाभरापासून या केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकारी नाहीत. त्यामुळे अन्य केंद्राच्या डाॅक्टरांकडे येथील कार्यभार साेपविण्यात आला आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे.
शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्रे येतात. या उपकेंद्रांतर्गत २६ गावे येतात. या गावांतील सुमारे पन्नास हजारावर लाेकांच्या आराेग्याची धुरा आहे. ही बाब लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर आहेत. मागील आठ दिवसांपर्यंत हे दाेन्ही डाॅक्टर कार्यरत हाेते. परंतु, यापैकी एकाने राजीनामा दिला आहे, तर दुसऱ्या डाॅक्टरचा अपघात झाला आहे. त्यामुळे आराेग्य विभागाने येथील पदभार येरमाळा येथील डाॅक्टरांकडे दिला. मात्र, तेही केवळ एकदाच येऊन गेले. त्यानंतर ते फिरकलेच नाहीत. याचा फटका परिसरातील गाेरगरीब रुग्णांना बसत आहे. हे थाेडके म्हणून की काय, औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. शिराढोण परिसरामध्ये डेंग्यू, सर्दी, खाेकला यासारख्या आजाराने डाेके वर काढले आहे. अशा काळातही केवळ मागणी नाेंदविली नसल्याने औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
काेट...
शिराढाेणसह परिसरात साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नियमित वैद्यकीय अधिकारी तसेच औषधी उपलब्ध करून द्यावी.
- विजय नाईकवाडे, शिराढाेण.
शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे दाेन्ही वैद्यकीय अधिकारी नाहीत. त्यामुळे येरमाळा येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे कार्यभार साेपविला आहे. औषधांचा तुटवडा असल्यास ताे तातडीने दूर केला जाईल.
- जहूर सय्यद, तालुका वैद्यकीय अधिकारी, कळंब.