'उद्धव ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं'; ओमराजेंनी घातलं साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:23 PM2022-07-27T15:23:29+5:302022-07-27T15:23:39+5:30
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
उस्मनाबाद- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. गावाखेड्यातील शिवसैनिक सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहे. तर, राजकीय पक्षाचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तर शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बंडखोर आमदार आणि खासदारांना शिवसैनिक त्यांची जागा दाखवतील, असा इशारा देखील ओमराजे निंबाळकरांनी दिला.
उद्धव ठाकरेंची मरेपर्यंत साथ सोडणार नाही, असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, असं साकडं देखील आई तुळजाभवानीकडे घातलं, असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं.
दरम्यान, मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटलं असतं. मात्र आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम पाहत नाहीत, तर ते शरद पवार यांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करताहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमाई, बाळासाहेबांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाली आहे, अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी केली.
सामनाने जाहिराती नाकारल्या-
दरवर्षी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी सामनात जाहिरात देतो. परंतु यावर्षी आमच्या जाहिराती घेऊ नये असं कर्मचाऱ्यांना वरून कळवण्यात आले होते. त्यामुळे यंदा आम्ही जाहिरात देत होतो परंतु ती सामनातून नाकारण्यात आली. उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर, दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. प्रत्येक खासदाराला जाहिरात नाकारण्याचा अनुभव आला असेल अशी माहिती शिंदे गटातील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली.