वंचित बहुजन आघाडीचा सेना-राष्ट्रवादीलाही धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:18 IST2019-04-08T16:14:54+5:302019-04-08T16:18:58+5:30
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देऊन बहुजन समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे़ मागच्या लोकसभेला विखुरलेला हा समाज एकत्र आल्यास दोन्ही प्रमुख पक्षांना फटका बसणार आहे़

वंचित बहुजन आघाडीचा सेना-राष्ट्रवादीलाही धसका
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अर्जुन सलगर हा नवा चेहरा समोर आणला आहे़ दलित, मुस्लिम व ओबीसी मतांची मोट त्यांच्याकडून बांधण्यात येत आहे़ या मतदारसंघात जवळपास ३५ टक्के मतदान या समाजाचे असणार आहे़
मागच्या निवडणुकीत हे मतदान विखुरलेले होते़ त्यातही ओबीसी समाज प्रामुख्याने मोदी लाटेत शिवसेनेच्या पाठीशी राहिला होता़ काही प्रमाणात दलित समाजानेही सेनेच्या पाठीशी आपले बळ उभे केले होते़ मुस्लिम समाज मात्र बहुसंख्येने राष्ट्रवादीच्या मागे उभा होता़ येथे बसपाही दखलपात्र मते मिळविते़ मागच्या वेळी त्यांनी लाटेतही २८ हजारांहून जास्त मते मिळविली होती़ २००९ मध्येही तितकीच मते त्यांच्यासोबत होती़ वंचित आघाडीमुळे हे मतदान यावेळी फिरते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल
दरम्यान, एकीकडे वंचित आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसेल असे सांगितले जात असले तरी उस्मानाबादेत ही शक्यता फिफ्टी-फिफ्टी आहे़ त्यामुळे वंचित आघाडी ही निर्णायकच ठरणार असून, ज्या पक्षाची मते ती कमी घेईल, त्यांना येथे फायदा होणार असल्याचे दिसते़ मागच्या वेळेस युतीला मिळालेली ओबीसी व अन्य बहुजन मते या आघाडीकडे वळल्यास सेनेच्या उमेदवारास फटका बसणार आहे़ तसेच मुस्लिम व दलित मते वंचितकडे वळल्यास राष्ट्रवादीला फटका बसणार आहे़