पिके जगवायची कशी? सरकार, महावितरणविराेधात शिवसेनेचा हल्लाबाेल
By सूरज पाचपिंडे | Published: September 4, 2023 06:59 PM2023-09-04T18:59:18+5:302023-09-04T18:59:27+5:30
आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
धाराशिव : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी उपलब्ध पाण्यावर खरीप पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व विनाखंड वीजपुरवठा हाेत नाही. त्यामुळे पाणी असूनही पिके करपून चालली आहेत. राज्य सरकार आणि महावितरणच्या विराेधात सोमवारी शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासन व महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पाण्याविना पिके करपून लागली आहेत. थोडेफार उपलब्ध असलेल्या पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी कसरत करीत आहेत. परंतु त्यांना महावितरण साथ देत नाही. कृषीपंपांना उच्च दाबाने वीज मिळत नाही. काही भागात तर एक दिवसाआड आठ तास वीज दिली जाते. त्यातही लपंडाव आलाच. असे असतानाही राज्य सरकार या प्रश्नावर बाेलायला तयार नाही. परिणामी, शेतकरी हताश झाले आहेत. सरकार आणि महावितरणच्या विराेधात शिवसेनेच्या वतीने येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमाेर हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शासन व महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार टिका केली.
जिल्ह्यात कुठंच आठ तास लाईट मिळत नाही. पिके वाळून चालली आहेत. शेतकरी लाईनमनला फोन करतात, मात्र ते फोन उचलल नाहीत. एक वर्ष झाली तरी नवीन सबस्टेशनचे टेंडर मंजूर झाले नाहीत. ऑईल अभावी डीपी बसविला जात नाही. त्यामुळे पीके करपू लागली आहेत. महावितरणने त्वरीत टेंडर काढून नवीन सबस्टेशन सुरु करावीत, तसेच शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरठा करावा, यापुढे शांततेत नाही तर रुमणे घेऊन आंदोलन करु असा, इशारा खासदार राजेनिंबाळकर यांनी महावितरणला दिला. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, साेमनाथ गुरव यांच्यासह शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.