कांदा निर्यात बंदीविरोधात शिवसेनेचा ‘जागरण गोंधळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:53 PM2020-10-02T17:53:26+5:302020-10-02T17:54:05+5:30
कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.
काक्रंबा : कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेनेच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याला योग्य भाव मिळणार नाही. त्यामुळे काक्रंबा येथील बस थांब्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी म्हणाले की, केंद्र सरकारने लवकरात लवकर कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या गाड्या उस्मानाबाद जिल्ह्यात कुठेही फिरू देणार नाही. याप्रसंगी तालुका उपप्रमुख रोहीत चव्हाण, चेतन बंडगर, उमेश खांडेकर, शाम माळी आदींनी केंद्र सरकारच्या विरोधात भाषणे करून निर्यात बंदी उठेपर्यंत शिवसेनेतर्फे लढा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.
या आंदोलनात तुळजापूर उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, काक्रंबा गण प्रमुख कालिदास सुरवसे, बालाजी बंडगर, भारत पाटील, शहाजी ननवरे, शंकर गव्हाणे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या फोटोला कांद्यांच्या माळा घातल्या. तसेच संबळ वाजून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनास काक्रंबा येथील भीम अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने लेखी पत्र देऊन पाठिंबा देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भिसे, अशोक जाधव, किशोर साठे, दत्ता भिसे, युवराज भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तुळजापूर मंडळ अधिकारी अनिल कुलकर्णी तसेच तलाठी बाळासाहेब पवार यांनी निवेदन स्विकारले.