शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 08:53 PM2019-06-06T20:53:44+5:302019-06-06T20:56:37+5:30
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली.
उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करीत असताना युवराज संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजेंसोबत राजसदरेवर बसण्याचा बहुमान एका शेतकरी कुटुंबाला देण्यात आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आणि वडिलांना राज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसविण्यात आले होते. रयतेच्या राजाच्या राज्याभिषेकाचा मान रयतेला मिळाला पाहिजे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी शेतकरी कुटुंबाला हा सन्मान दिला.
रायगडावरीलशिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. या शेतकरी कुटूंबियाच्या हस्ते पूजनही झाले. तसेच, त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनावेळी मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे, यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी शेतकरी कुटुंबीयाचा सन्मान करण्यात आला. लक्ष्मण अवचार यांनी नापिकी, दुष्काळीस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे 19 मे 2015 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. वयाच्या 25 व्या वर्षी लक्ष्मण यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने अवचार कुटंबियांवर मोठे संकट उभारले. तर, वडिल गणपती, आई चिवाबाई, पत्नी रेश्मा यांना मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळेच, छत्रपती संभाजी महाराजांनी विशेष निमंत्रण देऊन या शेतकरी कुटुंबीयास शिवराज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसण्याचा बहुमान दिला. रयतेच्या हस्ते राज्याभिषेक झाल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने रयतेचा सोहळा ठरेल, असे छत्रपती संभजीराजे यांनी म्हटले होते. त्यानुसार, अवचार कुटुंबीयांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावर्षी राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करीत असताना युवराज संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजेंच्या सोबत राजसदरेवर बसण्याचा बहुमान उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाला देण्यात आला.#शिवराज्याभिषेकpic.twitter.com/SUtpRjGymv
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 6, 2019
शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. शिवरायांच्या जयघोषांत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी रायगड येथे पार पडला. यावेळी हजारों शिवप्रेमीच्या उपस्थितीत खासदार संभाजीराजेनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले. यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग, पोलंडचे राजदूत दमियन इरज्याक, सचिव इवा स्टेन्किइव्हीक्झ, तुनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बुलग्रीयाचे राजदूत इलेनोरा दिम्तीवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी अनिल पारस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार, कोल्हापुरचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख उपस्थित होते.