Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:05 PM2022-07-11T18:05:17+5:302022-07-11T18:06:11+5:30

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

Shivsena: Uddhav Thackeray's letter to Shiv Sena MLA Kailas Patil who fled from Shinde group in Mumbai | Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

Shivsena: शिंदे गटातून मुंबईत पळून आलेल्या शिवसेना आमदाराला उद्धव ठाकरेंचं पत्र

googlenewsNext

उस्मानाबाद/मुंबई - शिवसेनेच्या गटात मोठी बंडखोरी झाल्यानंतर 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी शिंदे गटासोबत राहणं पसंत केलं. त्यामुळे, भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, शिवसेनेच्या 2 आमदारांनी शिंदे गटातून पळ काढत घरवापसी केली. त्यापैक एक होते उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील. आता, याच कैलास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 6 जुलै रोजी पत्र पाठवून त्यांच्या एकनिष्ठेचं कौतुक केलं आहे. 

आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचं पत्र मिळाल्याचं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पत्र आज प्राप्त झाले आणि एका अर्थाने कृतार्थ झालो. राजकारणात तत्व, निष्ठा ही मूल्ये पाळायचे बाळकडू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांना पाजले आहे. सच्चा शिवसैनिक ही मूल्ये आजही प्रामाणिकपणे, तळमळीने पाळतो, हे मागच्या काही दिवसांत संपूर्ण देशाने पाहिले आहे'', असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या पत्राबद्दल आमदारा कैलास पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

राजकारणात सत्ता येते जाते, पदे मिळतात आणि जातातही. पण, सच्च्या शिवसैनिकांच्या तत्वात काडीचाही अंतर कधी येत नसते. ८० टक्के समाजकारण व केवळ २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन संघर्षाला उतरलेल्या मावळ्यांना सत्ता-पदाची नक्कीच फिकीर नाही. शिवसेना आणि शिवसैनिक येणाऱ्या आव्हानांना निधड्या छातीने समोर जातात, हेही वेळोवेळी सिद्ध झाले आहे. 


कित्येक आले आणि गेलेही, पण शिवसेना मजबुतपणे उभी आहे, ती कट्टर शिवसैनिक मावळ्यांच्या जीवावर. उद्धव ठाकरेंनी माझ्यासारख्या शिवसैनिकावर दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवून दाखविणे, हेच आता ध्येय आहे. संघर्षाची वीण घट्ट गुंफून, चला पुन्हा उठुया पेटून... चला पुन्हा लढूया पेटून... असे म्हणत कैलास पाटील यांनी पक्षप्रमुखांच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.  

कैलास पाटील यांचा थरारक अनुभव

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे संकट उभं राहिलं होतं, जे पुढे सत्तांतरात बदललं. शिंदेगटाने आमदारांचे अपहरण करून त्यांना सूरतला नेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप झाला. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांसमोर थरारक अनुभव सांगितला होता. सोमवारी विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नव्हती. काही तासाचा प्रवास झाल्यानंतर चलबिचल सुरु झाल्याने पुढे शिंदे साहेब थांबले आहेत, त्यांना भेटू, असे सांगून वाहने तशीच पुढे नेण्यात आली. ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती. 
 

Web Title: Shivsena: Uddhav Thackeray's letter to Shiv Sena MLA Kailas Patil who fled from Shinde group in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.