शिवशाही कसली, ही तर मोगलाई; तपासाआधीच गृहमंत्र्यांची अत्याचारींना क्लीनचिट : चित्रा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 03:52 PM2021-02-02T15:52:56+5:302021-02-02T15:53:58+5:30
Chitra Wagh : अणदूर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचारानंतर चित्रा वाघ यांनी मंगळवारी पीडितेच्या कुटूंबियांची ग्रामस्थांची भेट घेतली.
उस्मानाबाद : राज्यात अल्पवयीन मुलींवर नियमित अत्याचार होत आहेत. अशा घटनांतील आरोपींना पकडण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही, मात्र गावगुंडांसोबत फोटो काढायला गृहमंत्र्यांना वेळ आहे. याउलट तपास सुरु असतानाही खुद्द गृहमंत्रीच बी समरी फाईल करायला सांगून अत्याचारींना क्लीनचिट देत सुटले आहेत. ही कसली शिवशाही आहे, ही तर मोगलाई असल्याची घणाघाती टीका भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उस्मानाबादेत केली.
अणदूर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचारानंतर चित्रा वाघ यांनी मंगळवारी पीडितेच्या कुटूंबियांची ग्रामस्थांची भेट घेतली. या घटनेतील दोन आरोपी पकडले असले तरी तिसरा आरोपी अद्याप मोकाटच आहे. याअनुषंगाने त्यांनी पोलीस अधिकार्यांच्या भेटी घेऊन दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, अणदूर, सास्तूर, नांदेड, चंद्रपूर, साताराच नव्हे तर राज्यभरात नियमित अत्याचार होत आहेत. या घटनांतील आरोपी पकडले जात नाहीत. त्यांना सरकार अन् पोलीस अभय देत आहेत. औरंगाबादच्या प्रकरणात तर हद्द झाली. एकिकडे डीसीपी सांगत आहेत की, तपास सुरु आहे. अन् दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री सांगताहेत की आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे आरोप केले जात आहेत. असे सांगून ते तपास होण्याआधीच आरोपींना क्लीनचिट देत आहेत. काय चाललंय हे? राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा सवालही वाघ यांनी यावेळी केला. मुंबई, महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. आता हेच पोलीस आरोपीचे लोकेशन मिळत नसल्याचे सांगत आहेत. आता पोलीस आरोपी पकडण्यासाठी लोकेशन, सीडीआरवरच अवलंबून राहणार का? असे विचारतानाच जोपर्यंत पोलीस व सरकारची महिलांना संरक्षण देण्याची मानसिकता तयार होत नाही, तोपर्यंत कोणतेही कायदे रक्षण करु शकत नाहीत, असेही वाघ म्हणाल्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक दत्ता कुलकर्णी, ॲड.अनिल काळे, ॲड.नितीन भोसले, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी गरड, युवा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, दीपक आलुरे व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री, आम्ही तुमचे कुटूंब नाही का..?
मुख्यमंत्री म्हणतात, माझे कुटूंब माझी जबाबदारी. राज्याचे प्रमुख या नात्याने संपूर्ण राज्यच त्यांचे कुटूंब आहे. मात्र, दररोज घडणार्या महिला अत्याचार्याच्या घटना पाहता राज्यातील आम्ही महिला त्यांच्या कुटूंबाच्या सदस्य नाहीत का? का ते घोषणेपुरतेच होते? असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केला.