रासायनिक खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 07:59 PM2019-03-15T19:59:01+5:302019-03-15T20:00:38+5:30
प्रतिबॅग १०० ते २०० रूपयांपर्यंत केली वाढ
उस्मानाबाद : दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. असे असतानाच हंगामापूर्वीच खतांच्या दरामध्ये वाढ करून सरकारने शेतकऱ्यांना ‘शॉक’ दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खत उत्पादक कंपन्यांनी ५० किलोच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रूपयांची वाढ केली आहे.
एक -दोन वर्षाआड दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. यंदा भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची घडी पूर्णत: विस्कटली आहे. यातूनच शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. अशा अडचणींच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करून ‘शॉक’ देण्याचे काम केले आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतकऱ्यांच्या खिशाला अवडजड होणारी आहे. ५० किलोे वजनाच्या प्रति बॅगमागे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १०० ते २०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
‘डीएपी’ खताच्या एका बॅगसाठी पूर्वी १ हजार २८० रूपये मोजावे लागत होते. आता शेतकऱ्यांना ‘डीएपी’च्या एका बॅगसाठी आता १ हजार ४७७ रूपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या खिशाला १९७ रूपयांची जास्तीची झळ बसणार आहे. १०:२६:२६ या खताची बॅग गतवर्षी शेतकऱ्यांना १ हजार १८३ रूपयांना मिळत असे. आता १ हजार ४०० रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच एक बॅगमागे २१७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना या खताची बॅग केवळ ९९७ रूपयांत मिळत असे. आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रूपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच बॅगमागे १०३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दुष्काळ आणि नापिकसारख्या संकटामध्ये पिचलेल्या शेतकऱ्यांना खताच्या दरामध्ये केलेली वाढ आर्थिक संकटांच्या गर्तेत लोटणारी आहे. त्यामुळे सदरील दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.
दृष्टिक्षेपात दरवाढ
खत पूर्वी सध्या
१२:३२:१६ १२९० १४६५
१४:३५:१४ १२७५ १४७५
२०:२०:१३ ९९७ ११००
१०:२६:२६ ११८३ १४००
डी.ए.पी. १२८० १४७७
(५० किलो बॅगचे दर)