धक्कादायक! एकतर्फी प्रेमात अडसर ठरणाऱ्या पित्यावर कुऱ्हाडीने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:38 IST2024-02-14T13:37:37+5:302024-02-14T13:38:10+5:30
याप्रकरणी वीटभट्टीमालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धक्कादायक! एकतर्फी प्रेमात अडसर ठरणाऱ्या पित्यावर कुऱ्हाडीने हल्ला
तुळजापूर (जि. धाराशिव) : वीटभट्टीवर कामास असलेल्या एका व्यक्तीवर प्रेमात अडसर ठरत असल्याने मालकानेच इतर दोघांच्या साह्याने कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना नरखोडी तांडा येथे घडली आहे. या घटनेत कामगार गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी नळदुर्ग ठाण्यात तिघांवर सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील सहदेव मस्के व त्यांचे कुटुंबीय नरखोडी तांडा, जळकोटवाडी येथील उत्तम राठोड याच्या वीटभट्टीवर काम करून उपजीविका भागवीत होते. यावेळी वीटभट्टी मालक उत्तम राठोड हा मस्के यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळविण्याचा प्रयत्न करीत होता. याबाबत सहदेव मस्के यांनी वीटभट्टी मालकास समजावूनही सांगितले होते. तेव्हा उत्तम राठोड, अर्जुन राठोड व निलाबाई राठोड यांनी कोणाला सांगू नको, म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, ११ फेब्रुवारीच्या रात्री सहदेव मस्के हे जेवण करून वीटभट्टीच्या ऑफिसकडे नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेले होते. काही वेळाने तेथून ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीयांनी तिकडे धाव घेतली असता सहदेव मस्के हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्यांना लागलीच सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्यात जखमी मस्के यांचा मुलगा अक्षय याने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, वीटभट्टी मालक उत्तम राठोड याच्या एकतर्फी प्रेमात वडील सहदेव मस्के हे अडसर ठरत होते. या कारणामुळे उत्तम राठोड याने वडिलास वीटभट्टीच्या ऑफिसमध्ये ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यात, तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले, तर उत्तम राठोड याची पत्नी निलाबाई राठोड व भाऊ अर्जुन राठोड यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीनुसार तिन्ही आरोपींवर नळदुर्ग पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी उत्तम राठोड यास पोलिसांनी अटक केली असून, अन्य दोघे फरार आहेत.