धक्कादायक ! पाथरूड शाळेतील सहा विद्यार्थी पाॅझिटिव्ह; शाळा १४ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 05:57 PM2022-01-04T17:57:34+5:302022-01-04T17:58:02+5:30
पाथरूड येथील भाऊराव काटे शाळेत परिसरातील खेडेगावातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात.
उस्मानाबाद/भूम -भूम तालुक्यातील पाथरूड येथील भाऊसराव काटे या शाळेतील जवळपास सहा विद्यार्थ्यांना काेविडची लागण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी चाैदा दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पाथरूड येथील भाऊराव काटे शाळेत परिसरातील खेडेगावातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. पाथरूडपासून काही अंतरावर असलेल्या जयवंतनगर येथील एका नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यास अचाक ताप, सर्दीचा त्रास सुरू झाला. त्याच्या कुटुंबियांनी त्यास पाथरूड आराेग्य केंद्रात नेऊन टेस्ट करून घेतली असता, त्यास काेराेनाची बाधा झाल्याचे समाेर आले. यानंतर डाॅक्टरांनी त्याची हिस्ट्री तपासली असता, सदरील विद्यार्थी आजारी असतानाही राेज शाळेत जात असल्याचे समाेर आले. गांभीर्य लक्षात घेऊन डाॅक्टारांनीतातडीने मुख्याध्यापक नयकिडे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार नववीच्या वर्गातील सर्व ५५ विद्यार्थ्यांच काेविड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असता, मंगळवारी सर्वांची टेस्ट केली. यापैकी आणखी पाच विद्यार्थ्यांना काेविडची लागण झाल्याचे समाेर आले. दरम्यान, आराेग्य विभागाने ही बाब सीईओ गुप्ता यांच्यासमाेर मांडताच त्यांनी शाळा चाैदा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी सुनिल गायकवाड यांनी संबंधित शाळेला तसे आदेश काढले आहेत.
आणखी सहा जणांची स्वॅब तपासणी...
आराेग्य विभागाकडून करण्यात आलेल्या चाचणीत पाचजण पाॅझिटिव्ह निघाले. तसेच आणखी सहाजण संशयित आहेत. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.
लक्षणे दिसताच तपासणी करा...
शाळेतील विद्यार्थ्यांत थाेडीबहुत लक्षणे आढळून आली तरी विद्यार्थ्यांनी आजार अंगावर काढून नये. पालकांनी पाथरूड आराेग्य केंद्रात येऊन आपल्या पाल्याची टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. अमाेल शिनगारे यांनी केले आहे. विध्यार्थी यांना केले आहे.
शाळा १४ दिवस बंद
पाथरूड येथील शाळेत सहा विद्यार्थ्यांना काेविडची लागण झाली आहे. नववीच्या वर्गातील सर्वांची काेविड टेस्ट करून घेण्यात आली आहे. संभाव्य धाेका लक्षात घेता, शाळा चाैदा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद.