तुळजापूर महामार्गावरील हॉटेलमध्ये गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:53+5:302021-02-05T08:12:53+5:30
उस्मानाबाद/समुद्रवाणी : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील तुळजापूरजवळील भंडारी शिवारात एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यात हाॅटेलचालक जखमी ...
उस्मानाबाद/समुद्रवाणी : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील तुळजापूरजवळील भंडारी शिवारात एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यात हाॅटेलचालक जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महामार्गावरील तुळजापूर ते लातूरदरम्यान असलेल्या भंडारी शिवारात बाळासाहेब दामोदर मोरे यांचे हॉटेल आहे. या हॉटेलवर बुधवारी दुपारी ४ तरुण एका जीपमधून आले होते. त्यांनी येथेच्छ मद्यपान केलेले होते. जेवणासाठी हॉटेलवर थांबल्यानंतर काही वेळांनी या तरुणांचा हॉटेलचालक मोरे यांच्याशी वाद झाला. हा वाद सुरू असतानाच एका तरुणाने त्याच्याकडील बंदूक काढून २ गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्याने हवेत झाडली, तर दुसरी मोरे यांच्यावर झाडली. ती चुकविण्याचा प्रयत्न मोरे यांनी केला. मात्र, त्यांच्या दंडाला लागून गोळी बरगडीत शिरली. त्यामुळे ते जखमी झाले. या घटनेनंतर चारपैकी ३ तरुण जीपमधून पसार झाले, तर एक जण हॉटेलवर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या हाती लागला. त्यांनी त्यास चोप देत पकडून ठेवले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, बेंबळी ठाण्याचे सहायक निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी नागरिकांनी पकडून ठेवलेल्या संशयितास ताब्यात घेतले. मात्र, तो जखमी होऊन बेशुद्ध झाल्याने त्यास तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सायंकाळी तो शुद्धीत आला. गुन्हे शाखेसह बेंबळी पोलीस त्याची चौकशी करीत होते. मात्र, मद्यपान व मारहाणीमुळे तो पोलिसांच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने उत्तरे देऊ शकत नव्हता. त्यामुळे कोणत्या कारणावरून गोळीबार झाला, हेही समोर येऊ शकलेले नाही. मात्र, तो नाशिक येथील रहिवासी असून, विश्वकर्मा नाव सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच त्याच्यावर व त्याच्या अन्य साथीदारावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलीस त्याच्या अन्य साथीदारांचा माग काढत आहेत. दरम्यान, जखमी हॉटेलचालक बाळासाहेब मोरे यांना लातुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांचा जबाब मिळताच बेंबळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
030221\03osm_1_03022021_41.jpg
तुळजापूर महामार्गावरील भंडारी शिवारात असलेल्या याच हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी हल्लेखोरांनी हॉटेलचालकावर गोळी झाडली.