कळंबमध्ये महाबीजचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:40 AM2021-06-09T04:40:54+5:302021-06-09T04:40:54+5:30
कळंब : तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी अंतिम टप्यात असून, मृगाच्या दमदार बरसातीनंतर लागलीच तिफणीवर मूठ धरण्याच्या तयारीत शेतकरी ...
कळंब : तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी अंतिम टप्यात असून, मृगाच्या दमदार बरसातीनंतर लागलीच तिफणीवर मूठ धरण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. दरम्यान, बाजारात विविध कंपन्यांच्या नऊ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता असली तरी महाबीजच्या बियाणांचा मात्र तुटवडा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कळंब तालुक्याचे अर्थकारण शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. तालुक्यातील एकूण लागवडीखाली असलेल्या लाखभर हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचा पेरा होतो. यामुळे खरीप हा प्रमुख शेती हंगाम असून, यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आदी प्रमुख पिके खरीप हंगामात घेतली जातात. पूर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून हा हंगाम बेतलेला आहे. एप्रिल, मे महिन्यातच या हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे करीत करीत जमीन पेरणीयोग्य केली जाते. यानंतर मृगाचा समाधानकारक पाऊस होताच जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीस सुरुवात होते. या सर्व प्रक्रियेतून शेतकरी आता पुढे जात पेरणीच्या तयारीला लागला आहे. खत, बियाण्यांची खरेदी, त्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असणारे शेतकरी हवं ते बियाणं घेण्यासाठी कृषि निविष्टा विक्रेत्याकडे ये-जा करत आहेत. यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीवर अधिक भर दिसून येत आहे.
दरम्यान, तालुक्यात विविध नामांकित कंपन्याचे तब्बल नऊ हजार क्विंटल बियाणे विविध कृषि सेवा केंद्रात उपलब्ध असल्याचे कृषि विस्तार अधिकारी विरेश अंधारी यांनी सांगितले असले तरी मागणी असलेले महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात अंधारी यांनी तालुक्याचा एक हजार क्विंटल महाबीज बियाणे उपलब्ध झाो होते, असे सांगितले.
चौकट...
यंदाही सोयाबीनचा वरचष्मा
तालुक्यात गतवर्षी पेरणी झालेल्या ७९ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ६४ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेर झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ८२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले. यामुळेच तालुक्याला सोयाबीनची कोठार अशी ओळख मिळाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः ६५ हजार हेक्टर पेरणी गृहीत धरली तरी सोयाबीन ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होण्याचा अंदाज आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागाने मात्र ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होईल, असे दर्शविले आहे.
म्हणे पन्नास हजार क्विंटल घरगुती बियाणे
दरम्यान, तालुक्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरा होण्याची शक्यता गृहीत धरत एकूण ४९ हजार क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता गृहीत धरली आहे. यास्थितीत ५१ हजार ६०० क्विंटल बियाणे घरगुती स्वरूपातील उपलब्ध आहे, असा अंदाज कृषी विभागाने काढला आहे. यावरच कृषी विभागाचे खरीप नियोजन बेतलेले आहे.
तालुकास्तरावरील भरारी पथक भुर्र
तालुक्यात तालुका कृषि अधिकारी, पं. स. चे कृषी अधिकारी, तालुका कार्यालयातील कृषी अधिकारी, वजन मापे निरिक्षक यांचे भरारी पथक गठीत करण्यात आले आहे. असे असले तरी केवळ अंधारी यांच्याच ‘व्हिजीट’ दिसून येत असून, इतरांचे पथक कुठे भुर्र झाले, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.