येळकोट, येळकोटचा जयघोष; ढोलकीच्या निनादात आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By गणेश कुलकर्णी | Published: September 18, 2023 04:50 PM2023-09-18T16:50:21+5:302023-09-18T16:50:57+5:30

तुळजापुरात आरक्षणासाठी धनगर समाज एकटवला

shout of Yelkot, Yelkot; Dhangar community's march for reservation in the chant of drum beat | येळकोट, येळकोटचा जयघोष; ढोलकीच्या निनादात आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

येळकोट, येळकोटचा जयघोष; ढोलकीच्या निनादात आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

googlenewsNext

धाराशिव : ‘कोण म्हणतंय देत न्हाई, घेतल्या शिवाय राहत न्हाई’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ चा गजर करीत अन् ढोलकीच्या निनादात धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज श्री क्षेत्र तुळजापुरात भव्य मोर्चा काढला. यानंतर जुना बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चास सुरूवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक, भवानी रोड, महाद्वार रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवार पेठ, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय येथून येऊन जुना बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी समाज बांधवांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारच्या भुमिकेवर संताप व्यक्त करीत आणखी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. डोक्यावर पिवळी टोपी घालून धनगर समाज मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. 

यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्यावे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक तुळजापूर व नळदुर्ग शहरात उभारावे, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी डॉ. जितेंद्र डोलारे, बालाजी बंडगर, बाबा श्रीनामे, समाधान देवगुंडे, चेतन बंडगर, राम जवान, ज्ञानेश्वर घोडके, गणेश सोनटक्के, अण्णा बंडगर, सुरेश कोकरे, देविदास पाटील, प्रमोद दाणे, सुदर्शन पांढरे, गणेश सोनटक्के आदी धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्मारकासाठी पन्नास लाखांचा निधी देणार
धनगर समाजाच्या मागण्या या न्यायी, रास्त आहेत. त्यासाठी माझा पाठींबा आहे. तुळजापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागेत उभा केला जाईल. त्यासाठी ५० लाख रूपायाचा निधी देण्याचा शब्द देतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या आजोळात चोराखळी येथे भव्यस्मारक, शिक्षणासाठी अद्यावत अभ्यासिका व्हावी अशी मागणी होती. यासाठीही आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आंदोलकांसमोर बोलताना दिली.

Web Title: shout of Yelkot, Yelkot; Dhangar community's march for reservation in the chant of drum beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.