मुद्रांक विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:38 AM2021-09-14T04:38:54+5:302021-09-14T04:38:54+5:30
उस्मानाबाद : शहरात काही दुकानांत मुद्रांक तथा स्टॅम्प पेपर जादा दराने विक्री होत असल्याची तक्रारी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या ...
उस्मानाबाद : शहरात काही दुकानांत मुद्रांक तथा स्टॅम्प पेपर जादा दराने विक्री होत असल्याची तक्रारी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींनंतर मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी अचानक भेट देऊन दुकानांची तपासणी केली असता, त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे मुंद्राक विक्रेत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शहरात गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प पेपरचा काळाबाजार सुरू होता. कृत्रिम टंचाई निर्माण करून अव्वाच्या सव्वा दराने स्टॅम्प पेपर्स विकले जात होते. पाचशे रुपयांचा स्टॅम्प साडेपाचशे रुपयाला विकला जात असल्याच्या तक्रारी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.
तक्रारीनंतर मुद्रांक जिल्हाधिकारी डी. जे. नाईनकर यांनी १ सप्टेंबरला कोर्टाशेजारील मुद्रांक विक्रेता सुहास देशमुख याच्या दुकानास भेट दिली असता, अनेक त्रुटी दिसून आल्या. यावेळी मुद्रांक विक्रेते स्वत: मुद्रांक विक्री करण्याऐवजी आपल्या वतीने दुसरा व्यक्ती त्याच्या हस्ताक्षरात मुद्रांक विक्री व नोंदवही अद्याप करीत असल्याचे आढळून आले. मुद्रांक विक्री करीत असलेल्या ठिकाणी मुंबई मुद्रांक पुरवठा व विक्री नियम १९३४ चे नियम १२ अन्वये मुद्रांक विक्रीच्या ठिकाणच्या दर्शनी भागात इंग्लिश अथवा स्थानिक भाषेत स्वत:चे नाव अथवा परवाना लायसन्स प्राप्त मुद्रांक विक्रेता असा फलक लावलेला नव्हता. तसेच मुद्रांक साठ्याचा फलक आढळून आला नाही.
यावरून देशमुख यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, आपला मुद्रांक विक्रीचा परवाना रद्द का करू नये? याचा खुलासा १५ सप्टेंबरपर्यंत न केल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे.