जमिनीच्या वादातून सख्ख्या भावास संपवलं; बहुचर्चित खून खटल्यात दाेघांना जन्मठेप
By बाबुराव चव्हाण | Published: January 24, 2024 05:45 PM2024-01-24T17:45:01+5:302024-01-24T17:45:12+5:30
धाराशिव न्यायालयाचा निकाल : दहा हजार रूपये दंडही ठाेठावला
धाराशिव : ‘तुला आपली एकत्र असलेली शेती विकण्यासाठी माझी व आईची संमती हवी आहे काय?’अशी विचारणा करीत सख्खा भाऊ असलेले लक्ष्मण येडगे यांना जमिनीवर पाडले. मेहुण्याला त्यांचे दाेन्ही हात धरायला लावून दगडाने ठेचले. या घटनेत लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. ही घटना तुळजापूर तालुक्यातील आरळी ते चिवरी शेतरस्त्यावर २०२० मध्ये घडली हाेती. हा बहुचर्चित खून खटला धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. समाेर आलेले पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. जे. माेहिते यांनी दाेघा आराेपींना २४ जानेवारी राेजी जन्मठेप अणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठाेठावली.
तुळजापूर तालुक्यातील येवती येथील धनाजी विनायक गवळी व त्यांचा मित्र लक्ष्मण मारूती येडगे हे २१ ऑक्टाेबर २०२० राेजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरळी-चिवरी शेत रस्त्यालगत असलेल्या शेतात गेले हाेते. लक्ष्मण येडगे हे शेतातील गवत कापत असतानाच साधारपणे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रामचंद्र मारूती येडगे व त्यांचा मेहुणा हरीश सायप्पा माशाळे (रा. मदरे, ता. दक्षिण साेलापूर) हे दुचाकीवरून शेतात आले. या दाेघांनी लक्ष्मण येडगे यांना राेडवर बाेलावून घेतले. ‘तू आई व माझ्या पत्नीला शिवगाळ का केली?’’ अशा शब्दात जाब विचारीत रामचंद्रने भाऊ लक्ष्मणला जमिनीवर पाडले. तर हरीश माशाळे याने त्यांचे दाेन्ही हात धरून ठेवले.
यानंतर रामचंद्रने बाजुलाच पडलेला दगड घेऊन ताेंडावर, नाकावर, डाेक्यात जाेराने मारले. ‘‘तुला आपली एकत्र असलेली शेती विकण्यासाठी माझी व आईची संमती हवी आहे काय, अशी विचारणा करीत आणखी रामचंद्र येडगे याने दगडाने मारले. येथून जाणारे काही लाेक भांडण साेडविण्यासाठी गेले असता, ‘‘तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. तुम्हालाही मारू’’, अशी धमकी दिली. त्यामुळे हे लाेक तेथून निघून गेले. ताेवर लक्ष्मण येडगे यांची हालचाल बंद झाली असता भाऊ रामचंद्र येडगे व त्यांचा मेहुणा हरिष माशाळे घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर काेणी तरी डाॅक्टरांनी फाेन केला असता, तिथे रूग्णवाहिका दाखल झाली. या रूग्णवाहिकेतून लक्ष्मण येडगे यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल केले असता, तपासून डाॅक्टरांनी मयत घाेषित केले.
दरम्यान, या प्रकरणी २१ ऑक्टाेबर २०२० राेजी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला हाेता. तपास करून पाेनि जगदिश राऊत यांनी न्यायालयासमाेर दाेषाराेपपत्र दाखल केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयासमाेर चालला असता, आठ साक्षीदार तपासण्यात आले. समाेर आलेले साक्षीपुरावे व जिल्हा शासकीय अभियाेक्ता शरद जाधवर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. जे. माेहिते यांनी आराेपी राम उर्फ रामचंद्र मारूती येडगे व हरीश सायप्पा माशाळे या दाेघांना दाेषी ग्राह्य धरले. या दाेन्ही आराेपींना जेन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठाेठावण्यात आली. अभियाेग पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियाेक्ता शरद जाधवर यांनी बाजू मांडली.
आठ साक्षीदार तपासले
नळदुर्ग पाेलिसांनी तपास करून न्यायालयामध्ये दाेषाराेपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने जवळपास आठ साक्षीदार तपासले. या साक्षीदारांच्या साक्ष आणि समाेर आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दाेघा आराेपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.