मुरुम फाटा-अक्कलकोट महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:24 AM2021-05-31T04:24:07+5:302021-05-31T04:24:07+5:30

उमरगाः तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर प्रामुख्याने मुरुम ते बोळेगाव या जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी ...

Siege of Murum Fata-Akkalkot Highway | मुरुम फाटा-अक्कलकोट महामार्गाची चाळण

मुरुम फाटा-अक्कलकोट महामार्गाची चाळण

googlenewsNext

उमरगाः तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर प्रामुख्याने मुरुम ते बोळेगाव या जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले असून, यामुळे वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून, कामाला मात्र अद्यापर्यंत सुरुवात झालेली नाही.

मुरुम फाटा ते अक्कलकोट हा केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग म्हणून नव्याने घोषित झाला आहे. यापूर्वी हा रस्ता राज्यमार्ग होता. या रस्त्यावरुन उमरगा, अक्कलकोट, आळंद, लातूर, भोकर, पुणे, पाथरी आदी आगाराच्या दिवसभरात पन्नास बसफेऱ्या होतात. पुढे हा रस्ता अक्कलकोट व उमरगा या गावांना जातो. ही दोन्ही गावे तालुक्याचे ठिकाण असल्याने वाहनांची वर्दळ नेहमी असते. तसेच कर्नाटकातील आळंद व इंडी तालुक्यालाही हा रस्ता जातो. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गर्दी असते.

दरम्यान, अतिवृष्टी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची मागील वर्षभरापासून चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुरुम ते बोळेगावपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धोकादायक खड्डे पडले असून, हा रस्ताच खड्डयांनी व्यापला आहे. मुरुम ते बेळंबचे अंतर केवळ पाच किलोमीटरचे आहे. रस्ता चांगला झाल्यास केवळ पाच मिनिटात मुरुमला प्रवाशांना जाता येईल. मात्र, खड्ड्यामुळे प्रवाशांना पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे. रस्त्याचे काम होईल तेंव्हा होईल, तोपर्यंत महामार्ग विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

चौकट........

नवीन उद्योगधंद्यांना मिळणार चालना

मुरुम फाटा ते अक्कलकोट मार्गे हा रस्ता कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला जोडला जाणार आहे. वागदरी ते अक्कलकोट दरम्यान रस्त्याचे काम चालू झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम फाटा ते बोळेगावच्या सीमेपर्यंत काम होणे आवश्यक आहे. हा रस्ता झाल्यानंतर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गाणगापूर येथील दत्त मंदिर, कर्नाटकातील विजापूर येथील गोलगुम्मट, अलमट्टी डॅम, तसेच मराठवाड्यातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला जोडला जाणार आहे. शिवाय कर्नाटकातील बीदर, कलबुर्गी, आणि आंध्रप्रदेशातील नारायणपेठ जहीराबाद, महेबूबनगर, संग्गारेड्डी आदी जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. महामार्ग विभागाकडून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दळणवळण आणि औद्योगिकरण वाढणार असून, नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.

कोट..........

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण देखील झाली आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराला या कामाचा वर्क ऑर्डर अद्याप मिळालेला नाही. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर कंत्राटदार काम सुरू करणार आहे. जवळपास ७० कोटी रुपयांची ही निविदा असून, यात रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम होणार आहे. मुरुमफाटा ते मुरुमपर्यंत १० मीटरने रस्ता वाढणार आहे. तसेच मुरुम ते बोळेगाव या उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ७ मीटरने रस्त्याची वाढ होणार आहे.

- विजय स्वामी, कनिष्ठ अभियंता, सोलापूर महामार्ग विभाग

फोटो ओळी : मुरुम ते अक्कलकोट या महामार्गावर अनेक ठिकाणी असे धोकादायक खड्डे पडले असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.

Web Title: Siege of Murum Fata-Akkalkot Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.