सिमला मिरची शेतकऱ्यांकडून पाच रुपयांना किलाे, ग्राहकांच्या पदरात वीसला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:36 AM2021-08-28T04:36:36+5:302021-08-28T04:36:36+5:30

सवाल - ग्राहकांना लुटणारी ‘‘मध्यस्थी’’ कुठंपर्यंत सहन करायची... कळंब - तरकारी मार्केटला विक्रीसाठी गेल्यावर सिमला मिरची चार, पाच रुपये ...

Simla Chili from farmers for Rs. | सिमला मिरची शेतकऱ्यांकडून पाच रुपयांना किलाे, ग्राहकांच्या पदरात वीसला...

सिमला मिरची शेतकऱ्यांकडून पाच रुपयांना किलाे, ग्राहकांच्या पदरात वीसला...

googlenewsNext

सवाल - ग्राहकांना लुटणारी ‘‘मध्यस्थी’’ कुठंपर्यंत सहन करायची...

कळंब - तरकारी मार्केटला विक्रीसाठी गेल्यावर सिमला मिरची चार, पाच रुपये किलोने विकली जात असली तरी, बाजारात मात्र व्यापारी ती वीस रुपये किलोने ग्राहकांच्या घशात घालत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अन् ग्राहकांना लुटणारी ही ‘‘मध्यस्थी’’ कुठंवर सहन करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आहारात लागणाऱ्या भाज्या बाजारात मिळतात. याच्या वितरण व्यवस्थेत शेतकरी कमी अन् व्यापारीच जास्त आहेत. यातच या भाज्या पिकवतात शेतकरी अन् विकतात मात्र व्यापारी. या प्रवासात शेतकऱ्यांचा हा ‘भाजीपाला’ व्यापाऱ्यांची ‘‘तरकारी’’ होतो अन् ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत असला तरी, त्याच्या ठोक खरेदी किमतीत अन् किरकोळ विक्री भावात कमालीची तफावत आहे. कोरोना लॉकडाऊन पर्वानंतरच्या दराचा विचार केला, तर लुटीचा हा शिरस्ता कायमच असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्च निघेना

१) उभ्या पिकावर नांगर फिरवला

माझ्या दोन एकर क्षेत्रात सिमला मिरचीचे पीक घेतले होते. निजामाबाद, सोलापूर, पुणे असे विविध मार्केट दाखवले. मात्र, तीन-चार रुपयांच्या पुढे किलोला भाव मिळेना. यात उत्पादन खर्च तर सोडाच, वाहतूक खर्चही निघेना. यामुळे उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे.

- रणजित दिवाने, शेलगाव (दि)

2) बिटमधील किलो, बाजारात पावकिलो

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्यास बाजारात दर मिळत नाही. व्यापारी लूट करायचे सोडत नाहीत. यात ना ग्राहकांचा फायदा आहे, ना शेतकऱ्यांचा होतोय. तो फक्त व्यापाऱ्यांना तरकारी मार्केटला एखादी भाजी १० रुपये किलो जात असेल, तर ग्राहकाला मात्र दहा रुपयाला पावकिलोच मिळत आहे.

- दत्तात्रय जाधव, इटकूर

ग्राहकांचे काय? विकणाऱ्यांनी ठरवायचे...

1) दररोजच्या आहारात भाजीसाठी विविध शेतीमाल खरेदी करावा लागतो. बाजारात व्यापाऱ्यांचे वर्चस्व असल्याने ते ठरवतील तोच दर आम्हाला कायम असतो. यामुळे आमच्या किंवा उत्पादक शेतकऱ्यांच्या मताला किंमत नसते. यामुळे शेतकऱ्यांकडून दहा रुपये किलोने घेतलेली भाजी आम्हाला केवळ मध्यस्थांच्या साखळीमुळे चाळीस रुपये किलोने घ्यावी लागते.

- सचिन क्षीरसागर, कळंब

2) देणाऱ्याने देत जावे अन् खाणाऱ्याने खात जावे, अशीच काहीशी अवस्था वर्षानुवर्षे आहे. टोमॅटो उत्पादक नातलगांना विचारले तर ते म्हणतात, चार, पाच रुपयांनी माल गेला अन् आम्ही बाजारात घ्यायला गेलो, तर वीस रुपयांच्या आत मिळत नाही. यामुळे मध्यस्थ लूट करत असल्याचे स्पष्ट होत आहे. दहा रुपयाची कारली चाळीस रुपयांनी घेतली.

भावात एवढा फरक का?

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला ठोक स्वरूपात विकला जातो. इथे काहींना किलोवर, तर काहींना जुडीवर, तर काहींना कॅरेटवर खरेदी केले जाते. यात स्थिरावलेले व्यापारी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व वाहतूक या बाबीचा विचार न करता आपला विशेषाधिकार वापरत भाव काढतात. पुढे ते इतर लहानसहान व्यापाऱ्यांना माल देतात. ते पुढे ग्राहकांना देतात. यामध्ये उत्पादकापेक्षा अधिक नफा हे मध्यस्थ कमावतात. यामुळे ग्राहकांनाही भुर्दंड सहन करावा लागतो. या सर्व बाबी एका व्यापाऱ्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.

Web Title: Simla Chili from farmers for Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.