दमदार पावसामुळे सीना-कोळेगाव धरण १०० टक्के भरण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 06:55 PM2020-10-12T18:55:22+5:302020-10-12T18:58:08+5:30
Sina-Kolegaon dam likely to fill 100 per cent due to heavy rains नदीकाठची जनावरे, घरे हलविण्याबाबत दवंडीद्वारे दिली सूचना
परंडा : गेल्या तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील साकत मध्यम प्रकल्प वगळता सर्व प्रकल्पांचे सांडवे दुधडी भरून वाहत आहेत. तर सीना-कोळेगाव प्रकल्पात येणाऱ्या सीना व खैरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मंगळवारी सायंकाळपर्यंत सीना-कोळेगाव धरण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
आठवडाभरापूर्वीच तालुक्यातील खासापुरी, चांदणी, मध्यम प्रकल्प व निम्न खैरी, तांबेवाडी, बृहत प्रकल्प भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तर साकत मध्यम प्रकल्प अद्यापही अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. भूम, खर्डा, जामखेड, नगर, येरमाळा येथे आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने कृष्णा खोरे अंतर्गत असलेले सर्व मध्यम प्रकल्प, बृहत प्रकल्प, साठवण तलाव, लघू सिंचन तलाव भरले असून, सीना-कोळेगाव प्रकल्पही दमदार पावसाने मंगळवारी सायंकाळी १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.
सोमवारी दुपारपर्यंत सीना-कोळेगाव प्रकल्पात ९२ टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्प भरण्याची पूर्ण शक्यता असल्याने पाटबंधारे खात्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीत करण्याची तयारी सुरू केली आहे. खबरदारी म्हणून प्रकल्पाखालील सीना काठच्या भोत्रा, आवाटी, रोसा, मुंगशी आदी गावांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रात कधीही पाणी सोडले जाईल त्यामुळे पात्रातील विद्युत मोटारी, शेती साहित्य शेतकऱ्यांनी काढून घ्यावेत. तसेच नदी काठावरील जनावरे, घरे इतरत्र हलवावीत, अशी दवंडी देण्यात आली आहे.
प्रकल्पात पाण्याची जोरदार आवक सुरू आहे
मागील दोन दिवस खर्डा, जामखेड, तांदुळवाडी, शेळगाव भागात झालेल्या दमदार पावसाने खैरी नदीला पूर आला असून, तांदुळवाडी व शेळगाव येथील पुलावरून पाणी वहात आहे. तसेच नगर जिल्ह्यात झालेल्या पावसाने सीना नदी व जामखेड तालुक्यातून येणारी विंचरणा ही तिची उपनदी दुथडी भरून वहात आहे. यामुळे सीना-कोळेगाव प्रकल्पात सध्या सर्वच मार्गाने पाण्याची जोरदार आवक सुरू आहे.
कोरडवाहू शेतकरी चिंताग्रस्त
यावर्षी जोरदार पाऊस झाला असून, अद्यापही खरिपाच्या राशी खोळंबल्या आहेत. वाफसा न झाल्याने रबीची विशेषत: पांढऱ्या शुभ्र दाणेदार ज्वारीची पेरणी थांबली असून, रबी हंगाम लांबला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तर दमदार पावसाने सर्व प्रकल्प, तलाव तुडूंब भरल्याने ऊस लागवडसाठी बागायतदारांची धावपळ सुरू आहे.