जिल्हा कुस्ती संघात परंड्यातील सहा पहिलवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:58+5:302021-09-04T04:38:58+5:30
सोनारी - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने इंदापूर येथे २३ वर्षाखालील फ्रिस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी परंडा ...
सोनारी - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने इंदापूर येथे २३ वर्षाखालील फ्रिस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी परंडा तालुक्यातील सहा मल्लांची निवड झाली आहे.
उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात विभागीय सचिव वामनराव गाते यांच्या अध्यक्षतेखाली संघ निवडीसाठी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील १९ ते २३ वयाेगटातील कुस्तीगीर सहभागी झाले हाेते. स्पर्धेत अटीतटीच्या झालेल्या लढतीत परंडा तालुक्यातील खालील कुस्तीगीर विजयी झाले आहेत. फ्रिस्टाईल कुस्ती विभागात ९२ किलाे वजन गटात दीपक जगताप सोनारी, ८६ किलाे वजन गटात हर्षवर्धन लोमटे डोमगाव नं.२, ७४ किलाे वजन गटात कुणाल देवकर कंडारी, ९७ किलाे वजन गटात रितेश भगत कंडारी, ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात ८७ किलाे वजन गटात भगवान मदने सामनगाव, १२५ किलाे वजन गटात धीरज बारस्कर परंडा हे विजयी झाले आहेत.
विजयी कुस्तीगीर ४ ते ५ सप्टेंबर रोजी इंदापूर येथे हाेणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा संघाचे नेतृत्व करणार आहेत. निवड झालेल्या कुस्तीगीरांना परंडा येथील भैरवनाथ तालीम संघाकडून सन्मानित करण्यात आले. निवडीबद्दल परंडा तालुका कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष नवनाथ जगताप व भैरवनाथ तालीम संघाचे प्रशिक्षक बालाजी बुरुंगे यांनी काैतुक केले.