आठ दिवसांच्या द्वंद्वानंतर तुळजाभवानीचे महिषासुरमर्दिनी रूप प्रकटले, महिषासुराचा वध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:08 PM2022-10-04T12:08:41+5:302022-10-04T12:09:48+5:30
आक्रमक स्वरूपात महिषासुरमर्दिनीचे रूप धारण करून तुळजाभवानी देवी महिषासुराचा वध करते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : सलग आठ दिवसांच्या द्वंद्वानंतर तुळजाभवानी देवीने महिषासुरमर्दिनी रूप घेत दैत्याचा वध केला होता. हे औचित्य साधून नवरात्रातील आठवी माळ अर्थात दुर्गाष्टमीला भोपी पुजारी बांधवांनी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडली होती. या लक्षवेधी पूजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यानंतर यजमान जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूर्णाहुतीसाठी होमशाळेतील होम प्रज्वलित करण्यात आला.
दुर्गाष्टमीनिमित्त तुळजाभवानी देवीचे मंदिर रात्री दीड वाजता उघडण्यात आले. चरणतीर्थ विधी झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. सकाळी पंचामृत अभिषेक पूजा संपल्यानंतर महंत, भोपी पुजारी दिनेश परमेश्वर, अतुल मलबा, समाधान परमेश्वर, संकेत पाटील व पाळीचे पुजारी राजाभाऊ कदम यांनी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा बांधली. या महापूजेत श्री तुळजाभवानी हातात त्रिशूल घेऊन महिषासुराचा वध करीत आहे, तर देवीचे वाहन सिंह हा महिषासुराचे वाहन मेष याच्यावर हल्ला करून त्याचा वध करीत आहे. या पूजेसाठी देवीला पैठणी महावस्त्राबरोबर विविध प्रकारचे सुवर्णालंकार घालण्यात आले होते.
सर्व देवदेवतांनी दिली शक्ती...
पार्वतीरूपी तुळजाभवानी गेले आठ दिवस दैत्यराज महिषासुर याच्याबरोबर द्वंद करीत असते; परंतु रक्तबीज वरदान प्राप्त असलेल्या महिषासुराचा वध अशक्य होतो. यामुळे सर्व देवदेवता एकत्रित येऊन तुळजाभवानीस सर्व शक्ती देऊन महिषासुरमर्दिनीचे वेगळे रूप देतात. यानंतर आक्रमक स्वरूपात महिषासुरमर्दिनीचे रूप धारण करून तुळजाभवानी देवी महिषासुराचा वध करते, अशी आख्यायिका सांगितली जाते. याचेच प्रतीक म्हणून महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडली जाते.