'झोपा काढो आंदोलन'; उमरग्यात रस्त्याच्या कामासाठी आंदोलक झोपले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 02:40 PM2020-02-17T14:40:35+5:302020-02-17T14:45:19+5:30
पालिका प्रशासनाने शहरातील पतंगे रस्त्याच्या महामार्गापासून ते बसवेश्वर विद्यालयपर्यंत काम करण्याचे आश्वासन दिले होते
उमरगा (उस्मानाबाद ) : शहरातील पतंगे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा कार्यारंभ आदेश आठ महिन्यापूर्वी देऊनही संबंधित ठेकेदार,पालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. यामुळे नागरिकांनी पतंगेरोड समितीतर्फे सोमवारी ( दि. १७ ) सकाळी रस्त्यावर झोपून अनोखे 'झोप काढो' आंदोलन करण्यात येत आहे.
यासंदर्भात संघर्ष समितीने तहसीलदारांना गुरुवार दिनांक 13 रोजी दिलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, पालिका प्रशासनाने शहरातील पतंगे रस्त्याच्या महामार्गापासून ते बसवेश्वर विद्यालयपर्यंत काम करण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी महामार्ग ते एल.डी.औरादकर यांच्या घरापर्यंत पाचशे मीटर लांबीचे डांबरीकरण करण्याचे काम मंजूर केले होते या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पात्र कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देऊन आठ महिने झाले तरी काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात होत आहे याबाबत अनेकदा तक्रार देऊनही पालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांनी 28 नोव्हेंबरला पालिकेवर हलगी मोर्चा आंदोलन केले होते.
यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी यांनी संबंधित ठेकेदारास नोटीस दिली त्यानंतर ठेकेदाराने रस्त्यासाठी दगड आणून टाकले मात्र होणारे काम एल.डी.औरादकर यांच्या घरापर्यंतच होईल तेवढ्याच कामासाठी दलितेतर निधीतून 42 लाख मंजूर असल्याची बाब नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली या रस्त्याला दोन पुलासाठी दलित वस्ती निधीतुन कामाचा प्रस्ताव मंजूर नसल्याचे सांगण्यात आले होते. संपूर्ण काम एप्रिल महिन्यापर्यंत करण्याचे लेखी पत्र नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे यांनी दिल्यानंतर आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले होते. त्याला दोन महिने झाले तरी पालिकेकडून कामाबाबतच्या हालचाली गतीने केल्या जात नसल्याने पतंगे रोड रहिवाशी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दि.17 रोजी पतंगे रस्त्यावर झोपा काढो आंदोलन सुरू केले आहे. समितीचे अध्यक्ष मनोज कुमार जाधव,उपाध्यक्ष सुनील औरादकर,सचिव आर.सी.पाटील,माजी नगरसेवक दत्ता रोंगे,प्राध्यापक सुग्राव बेंबळगे,सुशील दळगडे,प्रभाकर सगर,अमर देशटवार,विवेकानंद माळी आदीसह शेकडो नागरिक पतंगे रस्त्यावर झोप काढो आंदोलनात सहभागी झाले आहेत.