... म्हणून मुख्यमंत्र्यांसंदर्भात 'थिल्लर' हा शब्द वापरला, फडणवीसांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 04:46 PM2020-10-20T16:46:41+5:302020-10-20T16:48:01+5:30
मी काल दिवसभर पूरग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा केला, दिवसभरात कुठंही राजकीय वक्तव्य केलं नाही. तरीही, राज्याचे मुख्यमंत्री जर असं म्हणत असतील, फडणवीसांनी बिहारला जाण्याऐवजी दिल्लीला जावं, म्हणजे मोदी घराबाहेर पडतील.
उस्मानाबाद - लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौर्यात थिल्लर स्टेटमेंट करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. लोकांना मदत करण्याची यांच्यात हिंमत नाही. मुख्यमंत्री दोन-तीन तासांचा प्रवास करून थोड्या काळासाठी बाहेर पडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला माहीतच आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. आता, मी थिल्लरपणा हा शब्दप्रयोग का केला, याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलंय.
मी काल दिवसभर पूरग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा केला, दिवसभरात कुठंही राजकीय वक्तव्य केलं नाही. तरीही, राज्याचे मुख्यमंत्री जर असं म्हणत असतील, फडणवीसांनी बिहारला जाण्याऐवजी दिल्लीला जावं, म्हणजे मोदी घराबाहेर पडतील. हे शोभतं का मुख्यमंत्र्यांना?. हा थिल्लरपणा नाही तर काय आहे?, अशा रितीने फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना थिल्लरपणा म्हटलेल्या विधानाचं समर्थन करत स्पष्टीकरण दिलंय. तसेच, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या, मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. उलट सत्ताधारी पक्षाने राजकारण करायचं नसतं, अशा परिस्थिती सर्वांना सोबत घेऊन चालायचं असतं. मात्र, रोजच राजकीय स्टेटमेंट येतात, असेही फडणवीस यांनी म्हटले.
केंद्र सरकारनं आमचे पैसे अडकले आहेत ते अगोदर द्यावेत असं मुख्यमंत्री म्हणतात, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की राज्याकडून जीएसटी कमी आला आहे. त्याची भर काढण्यासाठी केंद्रानं कर्ज काढून राज्याला पैसे दिले आहेत. मुख्यमंत्री फक्त टोलवाटोलवी करत आहेत. काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचे. तुमच्या हिंमत नाही का? आम्ही सत्तेत असताना १० हजार कोटीची मदत लोकांना दिली होती. यांना मदत करायची नाही. राज्याला १ लाख २० हजार कोटी कर्ज काढण्याची मुभा आहे. हे फक्त लोकांची दिशाभूल करतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
सरकारकडून जे शक्य आहे ते करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.
फडणवीसांकडून अशी अपेक्षा नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाला 'थिल्लरपणा' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांना सुसंस्कृत नेते मानतो. त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधानं अपेक्षित नाहीत. सत्ता गेल्यामुळे त्यांचा तोल गेला आहे. त्यामुळे ते असे शब्द वापरू लागले आहेत, अशा शब्दांत थोरातांनी फडणवीसांवर टीका केली.