सोलापूर-लातूरकरांनी वाढविली जिल्ह्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:51+5:302021-04-01T04:32:51+5:30
उस्मानाबाद : नववर्षाच्या सुरुवातीला अगदी कोरोनामुक्तीच्या जवळ पोहोचलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात ४ हजार ६९९ रुग्णांची भर पडली ...
उस्मानाबाद : नववर्षाच्या सुरुवातीला अगदी कोरोनामुक्तीच्या जवळ पोहोचलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील तीन महिन्यात ४ हजार ६९९ रुग्णांची भर पडली आहे. यात मार्च महिन्यातच २ हजार ३९९ रुग्ण आढळून आले आहेत.आधीच कोरोनाचा संसर्ग असलेल्या नजीकच्या सोलापूर, लातूर,बीड जिल्ह्यातील नागरिकांची ये-जा झाल्याने हा परिणाम झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
लातूर, सोलापूर, बीड हे जिल्हे उस्मानाबाद जिल्ह्यास लागून आहेत. या जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून रुग्णांची लक्षणीय वाढ होत आहे. या जिल्ह्यात दिवसाकाठी ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यात २०० ते २२५ रुग्णांची नोंद होत आहे. शिवाय, मुंबई, पुण्यातही दिवसाकाठी हजारो रुग्ण आढळून येत आहेत. या जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकाची संख्या हजारोंच्या घरात आहे.
पॉईंटर...
बाहेरगावाहून येणाऱ्यांची चाचणीच नाही
जिल्ह्यात सोलापूर, लातूर, मुंबई,पुणे या जिल्ह्यातून दरदिवशी हजारो प्रवासी जिल्ह्यात दाखल होतात, परंतु जिल्ह्यातील कोणत्याच बसस्थानकावर या प्रवाशांची चाचणी करण्याची सुविधा दिसून येत नाही.
त्यामुळे प्रवास करून आलेले नागरिक थेट शहरात प्रवेश करतात. शिवाय जिल्ह्याच्या कोणत्याही सीमेवर कोरोना चाचणी केली जात नाही.
रेल्वेस्थानकावरही चाचणी केली जात नाही.रेल्वेतून उतरलेले प्रवासी थेट शहरात प्रवेश करताना आढळून येतात.
चौकटी...
एसटीमधून सर्वाधिक प्रवाशांचा प्रवास
उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ आगारातील एकूण ४५० बसपैकी २५० च्या जवळपास बस धावत आहेत. यातून प्रतिदिन ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत.यात सर्वाधिक सोलापूर, लातूर या मार्गावर बस धावत असल्याने या जिल्ह्यातून हजारो प्रवासी दाखल होत असतात.
१४ खासगी बसची वाहतूक
जिल्ह्यातील व लातूर, निलंगा येथील खासगी बस उस्मानाबाद शहरातून मुंबई, पुणे या मार्गावर धावत असतात. जिल्ह्यात या बसद्वारे ४०० ते ५०० प्रवासी दाखल होतात.
मुंबई,पुणे येथून रेल्वेने ये-जा
उस्मानाबाद येथील रेल्वे स्थानकावर सध्या मुंबई, पुणे येथूनच रेल्वे येत आहे. या रेल्वेतून प्रतिदिन २५० ते ३५० च्या जवळपास प्रवासी येत आहेत. या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नसल्याचे दिसून आले.