कुणी निराधारांसाठी तर कुणी कोरोना योद्धांना देताहेत मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:23 AM2021-04-29T04:23:52+5:302021-04-29T04:23:52+5:30
उस्मानाबाद : कोरोनामुळे लागलेली संचारबंदी आणि निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अनेक ठिकाणी हातावर पोट असलेले तसेच वयोवृद्ध, निराधारांच्या रोजीरोटीचा ...
उस्मानाबाद : कोरोनामुळे लागलेली संचारबंदी आणि निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अनेक ठिकाणी हातावर पोट असलेले तसेच वयोवृद्ध, निराधारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करीत असून, त्यांनाही कुठेतरी मानसिक पाठबळ मिळण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेत जिल्ह्यातील निराधार, गरजू कुटुंबांसोबतच कोरोनाकाळात संसर्ग रोखण्यासाठी मेहनत घेत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठीही काही व्यक्ती, संस्था, संघटना पुढे येत आहेत.
सचिन क्षीरसागर : निराधारांना देताहेत आधार
कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षीरसागर यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी आश्रयाला असलेल्या वृद्ध, निराधार, दिव्यांग मंडळींना खाण्यासाठी फळे, अल्पोपाहार वा वेळेप्रसंगी बिस्किटे असे पदार्थ उपलब्ध करून देत आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या बहुतांश बाजारपेठा बंद आहे. अशा स्थितीत शहरात काही मंडळी बसस्थानक, विविध दुकानांच्या पायथ्याशी, रिकाम्या सार्वजनिक जागा अशा ठिकाणी आश्रय घेऊन बसलेले आहेत. बाजारपेठा बंद असल्याने त्यांना कोणी आवर्जून खाण्यासाठी देत नाही. अशा मंडळींना सचिन क्षीरसागर हे सकाळी ७ ते ११ या वेळेत गावभर शोधून फळे, बिस्किटे किंवा परिचितांकडून जे काही खाद्यपदार्थ मिळतात, त्यांचे वाटप करत आहेत. केवळ निराधारांना आधार मिळावा, यासाठी आपण हा उपक्रम राबवित असल्याचे सचिन क्षीरसागर म्हणाले.
निखिल वाघ : कोरोना योद्धांच्या सुरक्षिततेची काळजी
उमरगा : समाज विकास संस्था व ऑक्सफम इंडियाचे कॉर्डिनेटर म्हणून कार्यरत असलेले निखिल भूमिपुत्र वाघ हे संस्थेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयात खाजगी कोविड सेंटर चालवणाऱ्या ग्रुप आणि संस्थांना पीपीई किट, सॅनिटायझर, सेफ्टी गॉगल व मास्क या आवश्यक वस्तूंचे हस्तांतर करीत आहेत. समाज विकास संस्थेमार्फत उमरगा येथे ईदगाह कोविड केअर सेंटरला पीपीई किट, सेफ्टी गॉगल देण्यात आले. उमरगा पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सेफ्टी गॉगलचे वाटप करण्यात आले. उस्मानाबादसोबतच बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांतही त्यांच्याकडून आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. मागील वर्षभरात संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद, पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणच्या गरजूंना जवळपास एक कोटी रुपये किमतीचे रेशन किट, सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केल्याचे निखिल वाघ यांनी सांगितले.
शिव मित्र मंडळ : गोळ्या, वाफेच्या मशिनचे वाटप
लोहारा : शहरात मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शिव मित्र मंडळाच्या माध्यमातून युवासेना तालुकाप्रमुख अमोल दत्तात्रेय बिराजदार यांनी शहरातील प्रत्येक घरामध्ये अर्सेनिक अल्बम गोळ्या, प्रत्येक शासकीय कार्यालय, बँका व नाभिक व्यावसायिकांना फेसशिल्ड व सॅनिटायझर पोहोच केले. तसेच शहरातील संपूर्ण बाजारपेठेत सॅनिटायझरचे वाटप केले होते. यंदाही फेब्रुवारी, मार्चमध्ये शहरामध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखावा, यासाठी शिव मित्र मंडळच्या माध्यमातून प्रभाग क्र ६ मधील जवळपास ३०० कुटुंबांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये वेपोरायझर (वाफ घेण्याची मशिन) वाटप
वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती अमोल बिराजदार यांनी दिली.
अजित चौधरी : रुग्णांना सकस आहाराचे वाटप
मुरूम : शहरातील शिवसेनेचे नगरसेवक अजित चौधरी हे कोरोनाकाळात अनेकांच्या मदतीला धावून जात आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनकाळात शहरातील गोरगरीब, गरजू नागरिकांना त्यांनी स्वखर्चातून ४०० ते ५०० अन्यधान्यासह किराणा कीटचे वाटप त्यांनी केले होते. याशिवाय, रक्तदान शिबिर, मास्क व सॅनिटायझरचे वाटप असे विविध उपक्रम राबविले. आता दुसऱ्या लाटेतदेखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. असे असताना शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या नागरिकांना जेवणात अंडी मिळत नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी याची दखल पुढील महिनाभर दररोज रुग्णालयात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अंडी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याशिवाय, इतरही मदत आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.