कोणी कॉइन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या नाकात गहू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:21+5:302021-09-07T04:39:21+5:30
उस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते आठ वर्षांचे होईपर्यंत त्याची काळजी घेणे गरजेचे असते. या काळात बालकांकडे दुर्लक्ष केल्याने खेळण्यासाठी ...
उस्मानाबाद : बाळ जन्मल्यापासून ते आठ वर्षांचे होईपर्यंत त्याची काळजी घेणे गरजेचे असते. या काळात बालकांकडे दुर्लक्ष केल्याने खेळण्यासाठी घेतलेले कॉइन गिळणे, खाण्यासाठी दिलेले शेंगदाणे नाकात घालणे तसेच गहू कानात घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. या वेळी पालक आपल्या मुलांना जिल्हा रुग्णालयाच्या बाल रुग्ण कक्षात दाखल करीत आहेत. मागील पाच महिन्यांत अशा ४० च्या जवळपास शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. लहान मुले काय खातील, काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे लहान मुलांना जिवापाड जपावे लागते. बाळ खेळत आहे, असे समजून पालक आपल्या कामात व्यस्त राहतात. याचवेळी बालके नकळत कॉइन, खोडरबर, सेल, सेफ्टी पिन गिळतात तर काही जण खेळताना गहू, सोयाबीन, हरभरा, वाटाणा नाकात - कानात घालतात. त्यामुळे पालक मुलांना बाल रुग्ण कक्षात उपचारासाठी दाखत करीत आहेत. शस्त्रक्रिया करून गिळलेले साहित्य काढावे लागते. वेळप्रसंगी बालकांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे मुलांची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
पाच महिन्यांत ४० शस्त्रक्रिया
कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेक जण घरात बसून आहेत. मात्र, घरात असतानाही वयस्कर व्यक्ती मोबाइल, टीव्ही पाहण्यात व्यस्त असतात. घरात असलेली लहान मुले सेफ्टी पिन, खोडरबर, सेल, कॉइन गिळत असतात तर काही मुले हातात दिलेली वस्तू कानात वा नाकात घालत असतात. तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारास दाखल केले जाते. मागील पाच महिन्यांत ४० च्या जवळपास शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
अशी घ्या मुलांची काळजी
लहान मुलांना खेळत असताना सेल, सेफ्टी पिन, कॉइन अशा वस्तू देऊ नयेत.
बाळाला ज्या ठिकाणी खेळण्यास सोडण्यात आले असेल त्या ठिकाणी सोयाबीन, शेंगदाणे, हरभरा, वाटाणा ठेवू नये.
मुले खेळत असताना घरातील एकाद्या व्यक्तीने त्याच्याजवळ थांबावे.
कोट...
कॉइन, सेफ्टी पिन, सेल गिळल्यास ते अन्ननलिका, श्वसननलिकेत अडकते. अन्न नलिकेतील वस्तू शस्त्रक्रियेद्वारे येथे काढल्या जातात मात्र श्वसननिलकेत अडकलेली वस्तू काढण्यासाठी मुलांना रेफर केले जाते. अशा वस्तू पोटात, नाकात जाणे जिवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनी काळजी घ्यावी.
डॉ. रवींद्र पापडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ