वेळा अमावस्येसाठी शेतात गेले, इकडे चोरट्यांनी घर फोडले; सोयाबीन विकलेली रक्कम लंपास

By आशपाक पठाण | Published: January 13, 2024 05:21 PM2024-01-13T17:21:55+5:302024-01-13T17:22:59+5:30

बामणी येथील घटना : दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐजव लंपास

Sometimes went to the field for the new moon, here thieves broke into the house | वेळा अमावस्येसाठी शेतात गेले, इकडे चोरट्यांनी घर फोडले; सोयाबीन विकलेली रक्कम लंपास

वेळा अमावस्येसाठी शेतात गेले, इकडे चोरट्यांनी घर फोडले; सोयाबीन विकलेली रक्कम लंपास

धाराशिव : वेळा अमावस्येसाठी शेतात गेल्यावर घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी धाराशिव तालुक्यातील बामणी येथील एका घराचे कुलूप तोडून रोख १ लाख ८० हजार, सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास अडीच लाखांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, धाराशिव तालुक्यातील बामणी येथील फिर्यादी गोवर्धन गणपती डोंगरे (वय ५१) हे वेळाअमावस्या असल्यामुळे गुरूवारी सकाळी घराला कुलूप लावून पत्नीच्या वडिलांच्या विठ्ठलवाडी शिवारातील शेतात गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरात ठेवलेल्या लोखंडी कपाटातील रोख रक्कम १ लाख ८० हजार रूपये व पत्नीचे मनी, मंगळसूत्र, फुले, झुमके असा जवळपास दोन तोळ्याहून अधिक वजनाचे दागिनेही लंपास केले. शेतातील सोयाबीनची विक्री करून त्यांनी १ लाख ८० हजार रूपये घरात आणून ठेवले होते. दागिने आणि रोख रक्कम एकाच कपाटात ठेवली होती. वेळाअमावस्येसाठी पत्नीसह बाहेरगावी गेल्यावर इकडे चोरट्यांनी कुलूप तोडून डल्ला मारला. याबाबत गोवर्धन डोंगरे यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयाबीन विकून ठेवली होती रक्कम...
शेतकरी गोवर्धन डोंगरे यांनी शेतातील सोयाबीन विकून १ लाख ८० हजार रूपये घरात ठेवले होते. चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत रोख रक्कम व त्यांच्या पत्नीचे मणीमंगळसूत्र, फुले, झुबे जवळपास २० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास बेंबळी पोलीस करीत आहेत.

Web Title: Sometimes went to the field for the new moon, here thieves broke into the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.