६ हजार हेक्टरवरील ज्वारी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:26 AM2021-01-02T04:26:42+5:302021-01-02T04:26:42+5:30
लोहारा : शहरासह तालुक्यात यावर्षी सुरुवातीला पावसाचा बराच खंड पडला. त्यामुळे नगदी पिके तर हातातून गेलीच. शिवाय परतीचा पाऊस ...
लोहारा : शहरासह तालुक्यात यावर्षी सुरुवातीला पावसाचा बराच खंड पडला. त्यामुळे नगदी पिके तर हातातून गेलीच. शिवाय परतीचा पाऊस जोरदार झाला आणि खरिपांची पिके पाण्याखाली बुडाली. त्यामुळे उत्पन्नात कमालीची घट आली. सध्या रबी पिकांवर शेतकऱ्यांची आशा आहे; परंतु सध्या या पिकावर अमेरिकन लष्करी अळीने हल्लाबाेल केला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.
सलग तीन ते चार वर्षे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या उत्पादनाची आशा होती; मात्र परतीच्या पावसाने तालुक्यातील शेत-शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. त्यामुळे सोयाबीन बरेच दिवस शेतातच पडून होते. त्यामुळे रबीची पेरणी लांबणीवर पडली हाेती.
अशा पिकांची रास करून शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे युद्ध पातळीवर केली. तरी ही रब्बीची पेरणी लांबणीवर पडली. खरिपाची पेरणी मृग नक्षत्रात तर रब्बीची पेरणी हस्त नक्षत्रात केल्याने ती फलदायी ठरते, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे; मात्र यंदा वेळेत पेरणी झाली नाही. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या; परंतु पाणी मुबलक असल्याने ज्वारीसह अन्य पिके जाेमदार आली आहेत; परंतु प्रमुख पीक असलेल्या ज्वारीवर सध्या अमेरिकन अळीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या अळ्या पानाचा हिरवा पापुद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडत आहेत. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या या पानाला छिद्रे करतात, तसेच पानाच्या कडा खातात. अळ्या ज्वारीच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारणपणे ज्वारीच्या एका ठाेंबावर एक किंवा दोन अळ्या दिसून येताहेत. जुनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या केवळ मध्य शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक रहात आहे. पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते. मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशिरा पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी आहे. त्यामुळे तालुक्यातील ६ हजार १६१ हेक्टरवरील ज्वारीचे पीक धोक्यात आले आहेत.
(चाैकट)
रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रार्दर्भाव दिसत असून, व्यवस्थापनासाठी क्लोरअन्ट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के फवारणी करावे, तसेच थायोमेथॉक्झॅम १२.६० टक्के, लैमडा सायहॅलोथ्रीन ९.५० टक्के पाण्यात टाकून फवारावे. स्पिनेटोरम ११.७ टक्के किंवा नोव्हालोरॉन ५.२५ टक्के, इमामेक्टिन बेंझोएट ०.९ टक्के १ लिटर पाण्यात मिसळून पाेंग्यामध्ये फवारणी करावी.
- मिलिंद बिडबाग, तालुका कृषी अधिकारी, लोहारा.
(चाैकट)
परतीच्या पावसामुळे हाता-तोंडाला आलेले सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. यानंतर रबी पेरणी उशिरा झाली तरी पिके जोमात आली आहेत; परंतु ज्वारी, मका, हरभरा पिकावर अळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून जात आहे.
- मल्लिनाथ वलदोडे, शेतकरी, जेवळी.