४३ हजार हेक्टरवरील सोयाबीन संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:37 AM2021-08-13T04:37:03+5:302021-08-13T04:37:03+5:30
वाशी : पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिके माना टाकू लागली असून, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी ...
वाशी : पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिके माना टाकू लागली असून, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करून पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. दरम्यान, यातही विजेच्या लपंडावामुळे व्यत्यय येत असल्याचे चित्र आहे.
वाशी तालुक्यात वाशी, पारगाव व तेरखेड असे तीन महसुली मंडळ विभाग असून, तिन्ही विभागांचे खरीप हंगामाचे क्षेत्र ४९ हजार ४६१ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ४३ हजार ३५२ हेक्टरवर खरीप हंगामातील पिकांचा पेरा झाला आहे. यामध्ये ३४ हजार ९७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा असून, हे पीक जोमात आहे. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे हलक्या रानावरील पिके करपून गेली असून, चांगल्या रानावरील पिकेही माना टाकू लागल्याचे चित्र आहे.
पावसाने उघडीप दिल्यामुळे निराश झालेला बळीराजा चिंताग्रस्त बनला असून, याचा परिणाम बाजारपेठेवरही झाल्याचे दिसत आहे. सणासुदीच्या दिवसातही बाजारपेठेत सामसूम दिसत असल्याने व्यापारीदेखील चिंताग्रस्त आहेत. पाऊस न झाल्यामुळे बळीराजाने हात आखडता घेतला असून येत्या दोन चार दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा बोजा वाढतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे़
विजेचा वापर वाढला...
खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकांना काही शेतकरी शेतातील विहिरी व बोअरचे पाणी तुषार सिंचनाद्वारे देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, सर्वांनी एकाच वेळी पाणी देण्यास सुरुवात केल्याने विजेचा वापर वाढला आहे़ परिणामी शेतीपंपास कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागला आहे़ अतिरिक्त भार वाढल्याने रोहित्र जळण्याचेही प्रमाण वाढले आहे.