सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, खोड माशीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:05+5:302021-08-29T04:31:05+5:30
यंदा कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख ३२ हजार ७३९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. जून व जुलै ...
यंदा कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी ५ लाख ३२ हजार ७३९ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. जून व जुलै महिन्यात पाऊस झाल्याने, प्रत्यक्षात ५ लाख ६३ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. या सर्वाधिक ३ लाख ७४ हजार ८९५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सध्या सोयाबीन पीक हे शेंगा लागणे ते शेंगा भरणी अवस्थेत अवस्थेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीन पिकावर गोगलगाय, मिलीपीड या किडीचा प्रादुर्भाव झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यावेळी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे कीड नियंत्रणात आली. त्यानंतर, तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. काही भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्या अनेक भागांत पाने खाणाऱ्या अळीचा, चक्रीभुंगा, उंट अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मागील काही दिवसांतील झालेल्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे सायोबीन पिकामध्ये पानावरील ठिपके व शेंगा करपा रोंगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते.
पॉईंटर...
खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र १९ हजार ९९८ इतके असून, प्रत्यक्षात २ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या पिकावर बहुतांश भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे.
वांगी पिकावरील शेंडा व फळे पाेखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकरी १० ते १५ फेरोमन ट्रॅप लावावेत, काढणीस तयार झालेल्या वांग्याची तोडणी करून विक्रीस पाठविण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे दोडका पिकामध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यू.पी १० ग्रॅम किंवा प्रोपिकोनाझोल २५ टक्के इ.सी. ५ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
कोट...
मूग, उडीद पीक शेंगा भरणी अवस्थेत असून, पीक परिस्थिती समाधानकारक आहे. सोयाबीन पीक शेंगा लागणे ते शेंगा भरणी अवस्थेत अवस्थेत आहे. काही भागांत पिकावर चक्रीभुंगा, उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी प्रोफेनोफऑस ५० टक्के २० मिली किंवा ट्रायझोफऑस २० मिली किंवा क्विनॉलऑस २० मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी.
यु.बी. बिराजदार, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.