...तर सोयाबीन बियाणासाठी खर्च करावे लागतील २८१ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:27 AM2021-07-25T04:27:14+5:302021-07-25T04:27:14+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. यात सर्वाधिक सोयाबीन पिकांवर अर्थव्यस्था अवलंबलेली आहे. गतवर्षी सोयाबीनला मिळालेला चांगला ...
उस्मानाबाद : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे. यात सर्वाधिक सोयाबीन पिकांवर अर्थव्यस्था अवलंबलेली आहे. गतवर्षी सोयाबीनला मिळालेला चांगला भाव त्यामुळे यंदाही सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले आहे. पुढील वर्षीही क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी २८१ कोटी रुपये मोजावे लागू शकतात. हा खर्च वाचविण्यासाठी घरच्या घरी बियाणे राखून ठेवले तर शेतकऱ्यांचा खर्च वाचू शकतो.
उस्मानाबाद जिल्ह्याचे खरीप २०२० मधील पेरणी क्षेत्र ६ लाख २ हजार हेक्टर इतके होते. यात सर्वाधिक ३ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला होता. पेरणीच्या ६२ टक्के क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली होते. मागील वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव व आलेली उत्पादकता यामुळे यंदाही सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्याचा विचार करता ३ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी ७५ किलो प्रति हेक्टर या बियाणे दराप्रमाणे २ लाख ८१ हजार २५० क्विंटल बियाण्याची आवश्यकता भासू शकते. बाजारातील सध्याला सरासरी १०० रुपये प्रति किलो दराने बियाणे विक्री होते. जिल्ह्यासाठी लागणाऱ्या बियाणासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल २८१ कोटी २५ लाख रुपये खर्च होऊ शकतात. शेतकऱ्यांनी घरचे बियाणे राखून खर्च वाचू शकतो तसेच उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
पॉईंटर...
बियाणे राखून ठेवताना ही घ्या काळजी...
बियाण्यासाठी राखून ठेवलेल्या प्लॉटमधील भेसळीचे झाडे काढून टाकणे, सर्वसाधारण पिकापेक्षा कमी किंवा जास्त उंचीची, वेगळ्या वेगळ्या रंगाची फुले व शेंगा असलेली तसेच रोगट झाडे काढून टाका.
कीड व रोगाचा योग्य बंदोबस्त करावा, कापणीनंतर किंवा काढणीनंतर पावसात भिजलेले बियाणे बियाण्यासाठी राखून ठेवू नये, कापणीनंतर सोयाबीन शेंगांवर बुरशी येईल अशा पद्धतीने साठवणूक करू नये,
मळणी करतेवेळेस मळणी यंत्राची गती ही ३०० ते ३५० आरपीएम ठेवावी.
साठवणूक करण्यापूर्वी बियाण्यातील आर्द्रता ९-१२ टक्के राहील याची काळजी घ्यावी.
बुरशीची वाढ होऊ नये, यासाठी बियाण्याची साठवणूक करताना बॅग कोंदट जागेत न ठेवता हवेशीर जागेत ठेवणे.
एकावर एक जास्तीत तीन बॅग साठवून ठेवाव्यात किंवा बॅगा भिंतीला लागून उभ्या कराव्यात.
पाेत्यांची थप्पी जमिनीपासून १० ते १५ से.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी.
बीबीएफ, टोकण पद्धतीचा अवलंब महत्वाचा
शेतकरी एकरी ३० किलो बियाण्यांचा वापर करीत असतात. पंरतु, बीबीएफद्वारे पेरणी केल्यास एकरी २० ते २२ किलो बियाण्याचा वापर करून उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ दिसून येते. तसेच टाेकण पद्धतीने लागवड केल्यास केवळ १० ते १२ किलो बियाण्याचा वापर होताे. त्यातून दीडपट ते दुप्पट उत्पादन मिळते.
कोट...
उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित जातीचा अवलंब, बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर, संतुलित खतांचा वापर आणि योग्य पद्धतीने पीक सरंक्षण महत्त्वाचे असते. सोयाबीन पीक स्वयंपरागीत असल्याने घरच्या घरी बियाणे राखून ठेवणे शक्य आहे. बरेच शेतकऱ्यांनी घरच्या घरी बियाणे राखून त्याची पेरणी केली आहे. त्याचे परिणाम सुध्दा चांगले आलेले आहेत. त्यामुळे बियाण्याचा तुटवडा व खर्च वाचविण्यासाठी बियाणे राखून ठेवावे.
उमेश घाटगे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी