भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, मिली बग, चक्री भुंगा, उंट अळीने स्वप्नांचा चुराडा केला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:18+5:302021-09-09T04:39:18+5:30
उस्मानाबाद : गतवर्षी सोयाबीनला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला पसंती दिली. त्यामुळे यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सध्या ...
उस्मानाबाद : गतवर्षी सोयाबीनला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला पसंती दिली. त्यामुळे यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सध्या पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतानाच कीड रोगाच्या प्रादुर्भावाने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील शेतकरी मूग, उडीद, तूर, ज्वारी याबरोबरच सोयाबीनचा पेरा करीत होते. मात्र, गतवर्षी सोयाबीनला ५ हजार ६ रुपये दर मिळाला. मागील तीन महिन्यांपूर्वी तर १० हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला. परिणामी ३ लाख ८४ हजार १३६ हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे. ऑगस्ट महिन्यात बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने पिके संकटात आली होती. पैसा, गोगलगाईने हल्ला चढविला होता. कृषी विभागाने जनजागृती केल्यानंतर शेतकऱ्यांनी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे पिके तरली. पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना आता चक्री भुंगा, उंट अळी, मिली बग किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यातच काही मंडलात अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने फवारणी करणे शेतकऱ्यांना जिकिरीचे ठरत आहे.
सोयाबीनचा पेरा
हेक्टरमध्ये
२०१७ ३००० २२७१००
२०१८ ३५०० २८९०००
२०१९ ४००० ३३८८०१
२०२० ५००० ते १०००० ३७४६००
२०२१ ३८४१३६ ------
काय आहे मिली बग?
ढेकणाप्रमाणे दिसणारी मिली बग कीड ही द्राक्षे, मूग, उडीद, तूर, सोयाबीन व इतर पिकांवर आढळून येते. ही कीड रस शोषून घेणारी आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.
पिकांमध्ये पाणी साचले
सोयाबीन पिकांवर चक्री भुंगा, उंट अळीचा प्रादुर्भाव आहे, तर काही भागात मिली बग कीडही आढळून येत आहे. मागील तीन-चार दिवसात जिल्ह्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागात शेतात अद्यापही पाणी साचून आहे. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांना फवारणी करणे कठीण होत आहे.
पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही?
पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी चक्री भुंगा, पाने कुरतडणारी अळी आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पेरणीवर लावलेला पैसाही निघतो की नाही, असा प्रश्न पडला आहे.
- किरण सावंत, शेतकरी
दोन एकरावर सोयाबीनचा पेरा केला आहे. पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. पाने कुरतडणाऱ्या अळीचे प्रमाण अधिक आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने त्यावर फवारणी करता येत नाही.
- आकाश जमदाडे, शेतकरी
पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत
मिली बग रस शोषणारी कीड काही भागात आढळून येत आहे. सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. किडीचे प्रमाण इटेलच्या खाली असल्यास फवारणी करण्याची गरज नाही. जास्त प्रादुर्भाव असल्यास फवारणी करावी.
- बी. यु. बिराजदार, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी