धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडूंना कोणी दिला आहे गोड बोलण्याचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 02:52 PM2020-02-18T14:52:22+5:302020-02-18T15:03:30+5:30
काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा काही फरक पडत नसतो़
- सूरज पाचपिंडे
उस्मानाबाद : धडाकेबाज मंत्री म्हणून ख्याती असलेल्या बच्चू कडू यांना सरकारमध्ये कसे बोलावे, याविषयी आता ‘बाळकडू’ पाजले जात आहेत़ पाच दिवसांच्या आठवड्यावरुन त्यांनी केलेल्या विधानानंतर वरून एक फोन आला आणि याविषयी चांगले सांगण्याचा निरोप मिळाल्याचे खुद्द कडू यांनीच अनौपचारिक चर्चेत सांगितले़ यानंतर मात्र, काम करणाऱ्यांना दोन दिवस सुद्धा पुरेसे असतात, असे सांगून ‘त्या’ फोनचा आदर राखला
राज्यमंत्री बच्चू कडू हे सोमवारी उस्मानाबादेत आले होते़ दुपारी त्यांनी जिल्हा न्यायालयात विधिज्ञ मंडळाची भेट घेऊन अनौपचारिक गप्पा मारल्या़ पाच दिवसांच्या आठवड्यास विरोध दर्शविणारे विधान कडू यांनी यापूर्वी केले होते़ त्याविषयी बोलताना ते म्हणाले, आम्ही पाच अन् सातचा हिशोब सांगत होतो़ वरून फोन आला़ हा हिशोब (निर्णय) चांगला, असेच सांगा़ त्यामुळे दोन अधिक दोन चार ऐवजी सहा म्हटले तरी, हो सरकार म्हणावे लागते़ कारण, सरकारचा हा आरसा टिकवायचा आहे़ या विधानांतून त्यांनी काहिशी हतबलता व्यक्त केली़ मात्र, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कडू यांनी ‘त्या’ फोनवरील निरोपाशी सुसंगत अशी भूमिका मांडून त्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले़ ते म्हणाले, काम करणाऱ्यांना दोन दिवससुद्धा पुरेसे असतात़ मात्र, जे अधिकारी-कर्मचारी कामच करीत नाहीत, त्यांना याचा काही फरक पडत नसतो़
नोटीस म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नव्हे
इंदोरीकर महाराज हे प्रवचन करतात़ समाजाच्या प्रबोधनाचे काम ते करतात़ जेव्हा ते दोन-दोन तास अखंड बोलतात, तेव्हा एखादी चूक बोलण्यात होऊ शकते़ मात्र, संपूर्ण दोन तासांतील नेमके तेच शब्द पकडून त्याचा बाऊ करण्याची पद्धत चुकीची आहे़ इंदोरीकर महाराजांना नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईलच असे नाही़ परंतु, ते जे काही बोलले त्यावर कायदा आपले काम करेल, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले.
सरकार पाच वर्षे टिकेल़
सरकारमध्ये विसंवाद कोठेही नाही़ त्यामुळे हे सरकार पाच वर्षे नक्कीच टिकेल़ जो काही विसंवाद दिसतो, तो चॅनल्सना बातम्या पुरविण्यासाठीचाच असतो, असे बच्चू कडू हसत हसत म्हणाले़