फादर दिब्रिटो यांच्या साहित्याचे खास दालन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:56 AM2020-01-10T05:56:29+5:302020-01-10T05:56:42+5:30
साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात पुस्तकांच्या विक्रीत १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
प्रज्ञा केळकर-सिंग
संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात पुस्तकांच्या विक्रीत १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संत साहित्याचे अभ्यासक, कार्यकर्ते, ठाम भूमिका घेणारे साहित्यिक म्हणून ओळख असलेले संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या साहित्याचे वेगळे दालन उभारले जाणार असून, त्यांच्या पुस्तकांवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
दिब्रिटो यांची ‘नाही मी एकला’ हे आत्मकथन, ‘सृजनाचा मळा’ हे ललित लेखन, पोप जॉन पॉल यांचे चरित्र, सुबोध बायबलचे दोन खंड, ‘ओएसिसच्या शोधात’ आणि ‘संघर्ष यात्रा ख्रिस्त भूमीची’ ही पाच पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यापैकी बायबलचे दोन खंड आऊट आॅफ प्रिंट असल्याने इतर पुस्तकांना चांगली मागणी प्राप्त झाली आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाचकांकडून पसंती मिळत आहे.
प्रकाशक सदानंद बोरसे म्हणाले, फादर केवळ लेखक नाहीत. चळवळीत उतरून क्रियाशील सहभाग घेणारे, समाजाबद्दल आस्था असणारे, धर्माच्या भिंती भेदून समाजहितैषी भूमिका घेणारे साहित्यिक आहेत. त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत व्यापक आहे. ते केवळ भाष्य करत नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होण्याची त्यांची तयारी असते. हरित वसईसाठी त्यांनी केलेला संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. त्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे आणि धडपड वाखाणण्याजोगी आहे.
>नेत्यांना मंचासमोर पहिल्या रांगेत स्थान : संमेलनाचे निमंत्रण नेत्यांना व मंत्र्यांना देण्यात आले आहे़ ज्यांनी संमेलनास उपस्थित राहण्याचे कळविले आहे, त्यांच्यासाठी मंचासमोरील पहिल्या रांगेत सन्मानपूर्वक व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले़
>प्रमुख साहित्यमंचासह अन्य दोन भव्य मंचही तयार झाले आहेत़ शहरातील भिंती विविध सामाजिक, पर्यावरणीय संदेश देणाऱ्या चित्रांनी रंगविण्यात आल्या आहेत़ शहराच्या चारही दिशांनी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत़
>नुकत्याच झालेल्या एका ग्रंथ प्रदर्शनामध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राला चांगला प्रतिसाद मिळाला. अजूनही वाचकांकडून पुस्तकाबाबत विचारणा आणि खरेदी केली जाते.
- रसिका राठीवडेकर