६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही; शेतकऱ्याने अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला!
By बाबुराव चव्हाण | Published: May 6, 2023 03:58 PM2023-05-06T15:58:56+5:302023-05-06T16:00:03+5:30
सांगवीतील शेतकरी हवालदिल; चार ते पाच रुपये किलाे दराने विकण्याची नामुष्की
तामलवाडी ( धाराशिव) : बाजारपेठेत कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. चार ते पाच रुपये किलाे एवढा अत्यल्प दर मिळत आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून काढणी आणि काटणीचाही खर्च निघत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील शेतकऱ्याने सुमारे दाेन एकरातील कांदा पिकावर कुळव फिरवून अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला.
शेतकरी ज्ञानदेव भानुदास मगर यांची सोलापूर- धुळे महामार्गालगत सांगवी काटी शिवारात शेतजमीन आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस त्यांनी दोन एकर क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड केली हाेती. कांदा काढणीला येईपर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला. मात्र, कांदा बाजारपेठेत दाखल हाेताच दर काेसळले. सध्या प्रति किलाे चार ते पाच रुपये एवढा अत्यल्प दर मिळत आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून कांद्याची काढणी व काटणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मगर यांनी सुमारे दाेन एकर क्षेत्रातील पिकावर कुळव फिरवून थाेडाथाेडका नव्हे तर अडीचशे बॅग कांदा मातीत गाडला. दरम्यान, सांगवी शिवारातील अन्य शेतकरीही हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी आणि उष्णतेमुळे काढणी झालेला कांदाही खराब हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे बाजारात दर मिळत नाही आणि दुसरीकडे कांदा टिकतही नसल्याने शेतकऱ्यांसमाेर माेठा प्रश्न निर्माण झाला आहे.
६० हजार रुपये खर्च, हाती दमडीही नाही...
शेतकरी ज्ञानदेव मगर यांनी दाेन एकरातील कांदा पिकावर सुमारे ६० हजार रुपये खर्च केला. मात्र, बाजारपेठेत दर मिळत नसल्याने त्यांनी हा कांदा शेतातील मातीत गाडला. पदरमाेड हाेऊनही हाती दमडीही पडली नसल्याने शेतकरी मगर हवालदिल झाले आहेत. अशीच काहीशी अवस्था गावातील अन्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.
ना अनुदान, ना मदत...
कांद्याचे दर घसरल्यानंतर सरकारने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र, हे अनुदान बाजारात विक्री झालेल्या कांद्यासाठीच लागू आहे. मात्र, दुसरीकडे काढलेला कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही हाती पडत नसल्याने शेतकरी कांदा जमिनीत गाडू लागले आहेत. अशा शेतकऱ्यांना काेण मदत देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.