उस्मानाबादेत जनता कर्फ्यूला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:18 AM2021-03-29T04:18:56+5:302021-03-29T04:18:56+5:30
उस्मानाबाद : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. उस्मानाबादेत सकाळपासून व्यापाऱ्यांनी ...
उस्मानाबाद : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. उस्मानाबादेत सकाळपासून व्यापाऱ्यांनी मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवली होती. शिवाय, जनतेने घरातच बसणे पसंत केल्याने दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र, मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम हाेती.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स पाळणे अनिवार्य केले आहे. शिवाय, कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रविवारी दुकाने बंद करण्यात यावे, तसेच नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण गर्दी करू नये, याबाबत पोलिसांनी शहरात फिरून विक्रेते, नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवली. त्यामुळे दिवसभर नेहरू चौक, अक्सा चौक, देशपांडे स्टॅन्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजमाता जिजाऊ चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, समता नगर परिसरातील दुकाने बंद होती. शिवाय, नागरिकांनी घरातच बसणे पसंत केल्याने शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. असे असले तरी मुख्य रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कायम होती.
बसस्थानकही पडले ओस
जनता कर्फ्यूमुळे अनेक नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. शिवाय, इतर काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने बसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. नेहमी प्रवाशांनी गजबजून असलेल्या स्थानकात रविवारी प्रवाशांची संख्या कमी होती. प्रवाशांच्या संख्येनुसार स्थानकातून बस सोडल्या जात होत्या.
पॉइंटर...
जनता कर्फ्यूत नियम मोडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांच्या वतीने दंडात्मक कारवाया केल्या जात हाेत्या.
असे असले तरी दुसरीकडे अनेक दुचाकीस्वार पोलिसांना हुलकावणी देत गल्लीबोळात फेरफटका मारता आढळून आले.
शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानात अनेक नागरिक टोळक्या टोळक्यांनी उद्यानात बसलेले आढळून आले.